‘सद्यस्थितीत भीती वाटणे, नकारात्मक विचार येणे हे स्वाभाविक आहे. ते टाळण्यासाठी मित्रांशी संवाद साधा. आपल्या भावना व्यक्त करा. हे एक वर्ष म्हणजे आयुष्य नाही. या एका वर्षांमुळे करिअरचे काहीही नुकसान होणार नाही हे कायम लक्षात ठेवा,’ असा सल्ला प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या वेबसंवादात गुरूवारी विद्यार्थ्यांना दिला. ‘मुलांसाठी भावनिक सुरक्षा सर्वात महत्वाची असते. त्यांना समजून घ्या, साथ द्या आणि संवाद साधा,’ असे त्यांनी पालकांना सांगितले.

सध्याच्या अनिश्चित वातावरणात करिअर कसे होणार, वर्ष वाया जाणार का? अभ्यास कसा करायचा? परीक्षा कशा द्यायच्या? अशा अनेक प्रश्नांनी भांबावलेले विद्यार्थी आणि चिंतीत पालक असे चित्र घरोघरी आहे. विद्यार्थी आणि पालकांना डॉ. शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. ‘लोकसत्ता’च्या स्वाती पंडित यांनी डॉ. शेट्टी यांच्याशी संवाद साधला. लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी प्रास्ताविक केले.

‘यापूर्वीही अनेक साथीचे रोग, संकटे जगावर आली. हे संकटही जाईल. मात्र, त्याला तोंड देताना मन स्थिर राखणे, मनोबल वाढवणे आवश्यक आहे,’ असे सांगून डॉ. शेट्टी म्हणाले, ‘ करिअर कसे होणार? दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा कशा देणार? असे वाटणे स्वाभाविक आहे. भीती ही स्वाभाविक भावना आहे. ती नाकारू नका. कुणी कायम सकारात्मक राहात नाही. मात्र, नकारात्मक विचाराची तीव्रता अधिक असेल, तर गेल्या काही दिवसांतील घटनांचे विश्लेषण करा.   एकटे राहूनही निराश वाटू शकते. जीवनसत्वांच्या कमतरतेमुळेही नकारात्मक विचार येऊ शकतात. विचारांमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी   जवळच्या व्यक्तीशी बोला. दहावी, बारावीच्या परीक्षेचा निकाल म्हणजे तुमच्या क्षमता किंवा कौशल्यांचे मोजमाप नाही, हे लक्षात घ्या. सध्याच्या परिस्थितीला तोंड देताना कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांशी असलेला संवाद महत्त्वाचा आहे. दहावी, बारावीनंतर काय करायचे असा संभ्रम असेल तर क्षमता चाचणी करा (अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट) आणि समुपदेशकांची मदत घ्या.’

व्यायाम महत्त्वाचा..

रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, मेंदू ताजातवाना राहण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. बाहेर जाता येत नसेल तर घरी सूर्यनमस्कार, पायऱ्यांची चढ-उतार असे व्यायाम करता येऊ शकतात. मुलांनी रोज अर्धा तास व्यायाम केला पहिजे. त्याचबरोबर मन स्थिर होण्यासाठी प्राणायाम करणेही महत्त्वाचे आहे. व्यायाम, प्राणायाम, सकस आहार आणि योग्य प्रमाणात पाणी पिणे, रात्री सलग आठ तास झोप यांबरोबरच आपल्या बरोबरच्या सर्वाना आवश्यक तसे सहकार्य करणे ही सध्याच्या काळात यशस्वी होण्याची पंचसूत्री आहे.

मुलांना विश्वासात घ्या!

सध्या अनेक कुटुंबे अडचणीतून जात आहेत. मात्र, त्याचा ताण मुलांवर येणार नाही याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. संवादातून हा ताण कमी करता येतो. नोकरी गेली, पगारात कपात झाली किंवा काहीही कौटुंबिक अडचणी असतील, तर त्यावर सर्व सदस्यांनी एकत्र बसून तोडगा काढायला हवा. या प्रक्रियेत मुलांनाही विश्वासात घेऊन सहभागी करून घ्यायला हवे. मुलांच्या करिअरबाबत त्यांना सतत बोलणे, अभ्यासावरून बोलणे टाळा. काही मुले हुशार असूनही त्यांना पालकांची भीती किंवा तणावामुळे प्रश्नपत्रिका समोर आली की काही आठवत नाही. घडून गेलेल्या गोष्टींबाबत सतत बोलू नका. प्रत्येक मूल वेगळे असते. त्यांची इतर मुलांशी तुलना करू नका. जेवताना अभ्यासाबद्दल, चुकांबद्दल अजिबात बोलू नका. मुलांच्या जडणघडणीत भावनिक सुरक्षा सर्वात महत्त्वाची असते. पालक मुलासमोर भांडले तरी हरकत नाही पण कसे भांडतात हे महत्त्वाचे आहे. पालक भावना व्यक्त करतात तेव्हा मुले ते पाहून शिकतात. राग येणे स्वाभाविक आहे, त्यातून आक्रमकता निर्माण होणे वाईट आहे.

ऑनलाइन शाळांचा ताण नको..

ऑनलाइन शाळेशी जुळवून घेण्यात काही अडचणी येणे शक्य आहे. त्याचा ताण घेऊ नका. प्रत्यक्ष वर्गात बसून शिकणे आणि ऑनलाइन वर्गात शिकणे यात फरक आहे. एखादी गोष्ट कळली नाही तर शिक्षकांना विचारा. ऑनलाइन वर्गात कंटाळा येत असेल तरी शिक्षकांना तसे मोकळेपणाने सांगा. सध्या अभ्यास करताना मुलांनी काही पथ्ये पाळली पाहिजेत. खोली बंद करून अभ्यास करू नये, ताठ बसावे, स्क्रीन आणि तुमच्यात योग्य अंतर ठेवावे. दोन तासिकांमध्ये मिळणाऱ्या मोकळ्या वेळात लगेच भ्रमणध्वनी वापरू नये. व्हिडिओ बंद ठेवायचा असल्यास शिक्षकांच्या परवानगीने तो बंद ठेवावा. प्रत्येक दिवसाचा अभ्यास त्याच दिवशी संपवावा; जेणेकरून नंतर त्याचा भार वाढणार नाही आणि नेमके कुठे अडते आहे ते कळू शकेल. येणाऱ्या अडचणी शिक्षक आणि पालकांशी मोकळेपणाने बोलाव्यात. रोज मित्रांशी गप्पा माराव्यात.

पुढील सत्रे..

* १९ सप्टेंबर, सायंकाळी ५ वा. ’ नोकरी आणि रोजगार संधींसाठी आवश्यक कौशल्ये आणि पदव्युत्तर शिक्षणाची दिशा ’ डॉ. श्रीराम गीत

* २० सप्टेंबर, सकाळी ११ वा. ’ करोनोत्तर काळातील विशेष वाव असलेल्या पदवीपूर्व शिक्षणसंधींचा आढावा ’ विवेक वेलणकर

https://tiny.cc/Loksatta_MargYashacha या लिंकवर जाऊन नोंदणी करा.