राज्यातील ज्येष्ठ साम्यवादी नेते, श्रमिकांच्या लढय़ातील अग्रणी, स्वातंत्र्यसेनानी कॉ. यशवंत चव्हाण यांचे (वय ९८) वृद्धापकाळाने मंगळवारी सकाळी पुणे येथे निधन झाले. दादर येथील स्मशानभूमीत सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारतातील १९४२ च्या ‘चलेजाव’च्या चळवळीच्या समर्थनावरून कॉ. चव्हाण यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडावे लागले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी नवजीवन संघटना, सर्व श्रमिक संघटना आणि लाल निशाण पक्षाची स्थापना करून आपले राजकीय-सामाजिक कार्य पुढे चालू ठेवले. पुरोगामी, डाव्या विचारांची कास धरून ते प्रतिगामी विचारांच्या विरोधात उभे राहिले. अलीकडेच त्यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये सर्व मतभेद बाजूला ठेवून लाल निशाण पक्ष मूळ भारतीय कम्युनिस्ट पक्षात विलीन केला. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.