गर्दीच्या वेळेत दहिसर स्थानकापर्यंतच लोकल सेवा सोडण्यासाठी सह्य़ांची मोहीम; पश्चिम रेल्वे व्यवस्थापनाचा स्पष्ट नकार

दर दिवशी दोन ते अडीच लाख प्रवाशांचा भार वाहणाऱ्या दहिसर स्थानकातून सुटणारी आणि दहिसर स्थानकापर्यंतच धावणारी लोकल पश्चिम रेल्वेने गर्दीच्या वेळी सोडावी, अशी मागणी आता पुढे येत आहे. उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस समितीने याबाबत पश्चिम रेल्वे प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार केला असून ही लोकल किती गरजेची आहे, हे ठसवण्यासाठी आता दहिसर स्थानकात मंगळवारपासून सह्य़ांची मोहीम राबवण्यात येणार आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने मात्र सावध भूमिका घेतली असली, तरी दहिसर लोकल चालू करणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात प्रवाशांनी केलेल्या आंदोलनानंतर या स्थानकात जलद गाडय़ांना थांबा देण्यात आला. दर दिवशी ९० हजार प्रवासी प्रवास करणाऱ्या या स्थानकातून सुटणारी लोकल असावी, यासाठी आता प्रयत्न होत आहेत. याच पाश्र्वभूमीवर पश्चिम रेल्वेवरील दहिसर स्थानकातील प्रवाशांनाही दहिसर स्थानकातून सुटणारी आणि दहिसपर्यंतच धावणारी गाडी सोडण्याची मागणी केली आहे. यासाठी उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस समितीने पुढाकार घेतला असून पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना निवेदनही दिल्याची माहिती जिल्हास्तरीय अध्यक्ष प्रमोद लोकरे यांनी दिली.

बोरिवलीनंतर विरारच्या दिशेने दहिसर हे पहिलेच स्थानक असून हे उपनगरही बोरिवलीसारखेच विस्तारले आहे. या स्थानकातून दर दिवशी दोन ते अडीच लाख प्रवासी प्रवास करतात. याआधीही दहिसर लोकलची मागणी पुढे आली होती, पण त्यावर पश्चिम रेल्वे प्रशासनाने नकारात्मक भूमिका घेतली होती. रेल्वे अधिकाऱ्यांनी एकदा गर्दीच्या वेळी दहिसर स्थानकातून गाडी पकडणे किंवा विरार लोकलमधून दहिसर स्थानकात उतरण्याची कसरत करून दाखवावी, असे आवाहनही आपण रेल्वे अधिकाऱ्यांना केले आहे, असे लोकरे यांनी सांगितले.

दहिसर लोकल शक्य नाही!

दहिसर स्थानकातून लोकल सोडण्यासाठी किंवा दहिसपर्यंत लोकल चालवण्यासाठी बोरिवली ते दहिसर यांदरम्यान अनेक कामे करावी लागतील. या कामांचा थेट परिणाम पश्चिम रेल्वेच्या वक्तशीरपणावर होईल. स्थानकातून गाडी सोडण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा दहिसर स्थानकात नाहीत. त्या करून देणे सध्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे या स्थानकातून लोकल सोडणे शक्य नाही. दहिसरमधून लोकल सोडण्यापेक्षा पश्चिम रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या वाढवून प्रवाशांना दिलासा देता येईल का, याची चाचपणी आम्ही करत आहोत.

 – मुकुल जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे (मुंबई)