स्वत:ची गाडी आहे. रोज रोज कोण गाडी चालवत कार्यालयात जाणार म्हणून अनेक जण इच्छा असून गाडी नेऊ शकत नाहीत. बरं चालक ठेवायचा म्हटला तर किमान १५ हजार रुपये पगार. मग अनेक जण टॅक्सीचा पर्याय निवडतात आणि कार्यालये गाठतात. याउलट मालकांकडून पिळवणूक होते, कामाच्या वेळांची निश्चिती नाही, यामुळे अनेक चालकही एकाच मालकासोबत फार काळ टिकत नाहीत. या सर्व प्रश्नांवर तोडगा म्हणून सिद्धांत मल्ली आणि सोविन हेगडे या दोन अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांनी मागणीनुसार चालक पुरविण्याची संकल्पना पुढे आणली आणि यातूनच झुवेर या कंपनीची स्थापना झाली.
असे आहे कंपनीचे काम
ही कंपनी आपल्याला मागणीनुसार चालकांचा पुरवठा करते. म्हणजे आपल्या घरातून कार्यालयात जाण्यासाठी किंवा कार्यालयातून घरी येताना प्रत्येकी दोन तासांचा प्रवास होतो. तर सकाळी घरातून आणि संध्याकाळी कार्यालयातून निघताना आपण या कंपनीच्या माध्यमातून चालक मागवू शकतो. तो चालक जेवढा वेळ आपल्या सोबत असेल तेवढय़ा वेळाचे पैसेच आपल्याला त्याला द्यायचे आहे. चालकाची मागणी करण्यासाठी आपण अ‍ॅपचा वापर करू शकतो. याचबरोबर कंपनीचे कॉल सेंटर आणि संकेतस्थळही उपलब्ध असून त्याद्वारेही आपण चालकाची मागणी करू शकतो. आपण चालकाची मागणी केल्यावर ४० मिनिटांमध्ये आपल्याला चालक मिळू शकतो.
ग्राहकाचा फायदा
जर आपण पूर्णवेळ चालक ठेवला तर त्याला दरमहा किमान १५ ते १८ हजार रुपये पगार द्यावा लागतो. या सुविधेमध्ये आपल्याला आपण जेवढा वेळ चालकाकडून सुविधा घेऊ तेवढय़ा वेळाचेच पैसे मिळतात. याशिवाय या कंपनीने नियुक्त केलेल्या चालकांना ओळखपत्र दिलेले असते. या कंपनीत चालकाची भरती झाली की त्याला योग्य ते प्रशिक्षणही दिले जाते. आपल्याला शहरातल्या शहरात किंवा बाहेरगावी जाण्यासाठीही चालक उपलब्ध होऊ शकतो. याशिवाय कंपनीचा दर हा तासाला १०० रुपये इतकाच आहे. यामुळे हा दर इतर चालकांच्या दराच्या तुलनेत कमी आहे.
भविष्याची वाटचाल
या कंपनीची सुविधा सध्या मुंबई शहरापुरतीच मर्यादित आहे. यासाठी कंपनीकडे ६० चालक उपलब्ध आहेत. ही संख्या मे अखेरीपर्यंत १२० पर्यंत जाईल, असा विश्वास सिद्धांत यांनी व्यक्त केला. यानंतर ही सेवा बंगळुरू आणि पुणे शहरात देण्याचा मानसही सिद्धांत यांनी व्यक्त केला. याशिवाय लोकांना गाडीशी संबंधित सर्व सुविधा पुरविण्याचा मानस कंपनीचा आहे. शहरांमध्ये अनेकदा पार्किंगची समस्या जाणवते. यावर उतारा म्हणून आमचा चालक गाडी घेऊन ती योग्य ठिकाणी पार्क करेल आणि जेव्हा ग्राहक गाडी परत बोलवेल तेव्हा ती उपलब्ध होईल. याशिवाय सध्याची सेवा थेट ग्राहकांशी संबंधित आहे. ती कंपन्यांशी जोडण्याचा मानसही सिद्धांत यांनी बोलून दाखविला. याशिवाय जर कुणाला गाडीची बॅटरी बदलायची आहे, चाकांची दुरुस्ती करायची आहे अशा अनेक सुविधा या माध्यमातून दिल्या जातील, असे सिद्धांत यांनी सांगितले.
नवीन उद्योजकांना कानमंत्र
आपण ज्यावेळेस एखादी संकल्पना घेऊन बाजारात येतो तेव्हा आपण खूप उत्साही असतो. मात्र केवळ उत्साही न राहता ती संकल्पना भविष्यात किती तग धरू शकते याचा विचार करा. याचबरोबर अनेक अनुभवी लोकांशी चर्चा करा आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घ्या.

निधीचे आव्हान
कोणतीही नवी कंपनी म्हटली की त्याच्या संकल्पनेचे जोरदार स्वागत होते. मात्र पैसे गुंतवण्यासाठी फार कोणी उत्सुक नसतात. झुवेरलाही या अनुभवातून जावे लागले. सुरुवातीच्या काळात निधीची अडचण जाणवली. आज नवउद्योगांना निधी देण्यासाठी कंपन्या जितक्या खुलेपणाने समोर येत आहेत तितका खुलेपणा दीड ते दोन वर्षांपूर्वी नव्हता. पण कंपनीची संकल्पना वेगळी असल्यामुळे निधी मिळत गेल्याचे सिद्धांतने सांगितले.

असे मिळते उत्पन्न
या सुविधेसाठी कंपनी ग्राहकांकडून जे पैसे घेते ते कंपनी आणि चालक यांच्यात ८०:२० या गुणोत्तरात विभागले जाते. म्हणजे आपण दिलेल्या रकमेतील ८० टक्के रक्कम ही चालकाला मिळते व उर्वरित २० टक्के रक्कम कंपनीला मिळते. या आणि इतर अटींच्याबाबतीत कंपनी आणि चालक यांच्यात एक कंत्राट केले जाते.

नीरज पंडित niraj.pandit@expressindia.com