मोटार अपघात दावा लवादाचा निर्णय, मागणीपेक्षा अधिक भरपाई

मुंबई : राज्य रस्ते परिवहन विभागाच्या बसला झालेल्या अपघातात उजव्या हाताला गंभीर दुखापत झालेल्या लसूण विक्रेत्या महिलेला सव्याज २३ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात दावा लवादाने दिले आहेत. विशेष म्हणजे या लसूण विक्रेतीने १३ लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितली होती. मात्र लवादाने तिला २३ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.

उल्हासनगर येथील रहिवासी असलेल्या अलका तुपारे (४२) यांना त्यांच्याच चुकीमुळे दुखापत झाल्याचा दावा राज्य रस्ते परिवहन मंडळाने (एमएसआरटीसी) लवादापुढील सुनावणीत केला होता. प्रवासादरम्यान तुपारेच्या हाताचा कोपरा खिडकीवर होता. परिणामी समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने बसला धडक दिली त्यावेळी तुपारे यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. प्रवासादरम्यान खिडकीतून हात बाहेर काढू नये वा खिडकीवर ठेवून बसू नये, असा इशारा बसवाहक व चालकाकडून देण्यात आल्याचा दावा एमएसआरटीसीने केला होता. परंतु असा कुठलाही पुरावा सादर करण्यात आला नाही, असे लवादाने तुपारे यांचा भरपाईचा दावा मंजूर करताना नमूद केले. पोलिसांनी या प्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्य़ातही हे कु ठेच नमूद केलेले नाही. किंबहुना अपघातानंतर तीन वर्षांनी राज्य रस्ते परिवहन मंडळाने पहिल्यांदाच लवादासमोर लेखी स्वरूपात हा दावा केला. कायदेशीर सल्ल्यानंतर निष्काळजीपणा लपवण्यासाठी एमएसआरटीसीने हा दावा के ल्याचे दिसून येते, असे लवादाने म्हटले.

लसूण विक्रीतून महिन्याला साडेसात हजार रुपयांचे उत्पन्नही मिळायचे. परंतु अपघातानंतर उजव्या हाताने काम करणे कठीण झाले. परिणामी लसूण विक्रीचा व्यवसायही बंद करावा लागला.

संपूर्ण कुटुंब आता रिक्षाचालक असलेल्या पतीच्या उत्पन्नावर अवलंबून असल्याचा दावा तुपारे यांनी लवादासमोर केला आणि त्यांनी १३ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली. त्यावर भरपाई वाढवून देण्याचे अधिकार लवादाला असल्याचे नमूद करत तुपारेला अपंगत्वामुळे भविष्यात होणाऱ्या उत्पन्नाच्या हानीसाठी १३.५० लाख रुपयांची भरपाई लवादाने मंजूर केली. शिवाय पुढील १५ वर्षे तिला जे नुकसान सोसावे लागणार त्याचाही हिशेब करून लवादाने तिला २३ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.

काय झाले?

तुपारे यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये लवादाकडे धाव घेत नुकसानभरपाईचा दावा केला होता. १४ मे २०१५ रोजी त्या एसटीने प्रवास करत होत्या. त्यांची बस माळशेज घाटाजवळ असताना समोरून भरधाव येणारा टेम्पो त्यांच्या बसवर धडकला. या अपघात तुपारे यांनाही दुखापत झाली. बसच्या चालकाने अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु टेम्पो भरधाव वेगाने आल्याने अपघात टळू शकला नाही, असा दावा एमएसआरटीसीने केला, तर अपघातासाठी दोन्ही वाहने जबाबदार असल्याचे लवादाने आदेशात म्हटले. तसेच अपघातात दोन वाहनांचा समावेश असेल तिथे कोणत्या वाहनाविरोधात भरपाईची दावा करायचा हे ठरवण्याचा अधिकार जखमीला असल्याचेही लवादाने नमूद केले.