उमाकांत देशपांडे

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे २५ हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई देण्याची मागणी शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने केली असली तरी त्यांना शासकीय निकषांनुसारच भरपाई देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील सुमारे ९२ लाख शेतकऱ्यांना फटका बसल्याचे पंचनाम्यानंतर दिसून आले असून, सुमारे ९० लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

भरपाईसाठी सुमारे नऊ हजार कोटी रुपयांची आवश्यकता असून केंद्र सरकारला मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकसानभरपाई संदर्भात चर्चा करण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक बोलाविली आहे.

अवेळी पावसाने झालेल्या नुकसानाचे केवळ अहमदनगर जिल्हा वगळता पंचनामे पूर्ण झाले असून तीही आकडेवारी लवकरच येईल. राज्यात सुमारे दीड कोटी शेतकरी असून एक कोटी ५० लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. सुमारे एक कोटी २६ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे. सुमारे ९२ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असल्याचे दिसून आले आहे.

संसदेची मंजुरी आवश्यक

अवकाळी पावसामुळे नुकसानीसाठी २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी होत आहे. परंतु राज्यात राष्ट्रपती राजवटीमुळे विधीमंडळाचे अधिकार संसदेकडे गेल्याने भरपाईसाठी निधीची तरतूद करण्यास संसदेची मंजुरी घ्यावी लागणर आहे. त्यामुळे निकषांचे पालन करावे लागणार आहे.