विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत संख्याबळाच्या आधारे नवव्या जागेसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भाजपमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता दिसते. सहा जागा जिंकण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असताना, भाजप सत्ताधाऱ्यांमध्ये फोडाफोडी करीत चौथी जागा जिंकून सत्ताधाऱ्यांना धक्का देण्याच्या प्रयत्नात आहे.

विधान परिषदेचे नऊ आमदार एप्रिल महिन्यात निवृत्त होत असल्याने लवकरच निवडणूक जाहीर होईल. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी तीन, काँग्रेसचे दोन, तर शिवसेनेचा एक सदस्य निवृत्त होत आहेत. राज्यसभेकरिता खुल्या पद्धतीने मतदान होते, तर विधान परिषदेसाठी गुप्त मतदान असल्याने मतांची फोडाफोडी किंवा घोडेबाजाराला वाव असतो.

संख्याबळाच्या आधारे आघाडीचे पाच, तर भाजपचे तीन असे आठ उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे निवडून येऊ शकतात.महाविकास आघाडी आणि भाजप यांना अतिरिक्त जागा जिंकण्याकरिता काही मते कमी पडतात.

निवडून येण्यासाठी किती मतांची आवश्यकता?

नऊ जागांकरिता मतदान होणार असल्याने पहिल्या पसंतीची २९ मते विजयाकरिता आवश्यक असतील. विधानसभेतील संख्याबळाचा विचार केल्यास महाविकास आघाडीला १७० सदस्यांचा पाठिंबा आहे. सहावी जागा जिंकण्याकरिता सत्ताधाऱ्यांना १७४ मतांची आवश्यकता असेल. म्हणजेच चार मते कमी पडतात. भाजपचे १०५ आमदार असून, काही अपक्षांचा पाठिंबा आहे. चौथा उमेदवार निवडून आणण्याकरिता भाजपला एकूण ११६ मते लागतील. अपक्षांच्या पाठिंब्यानंतरही काही मते कमी पडतात. सत्ताधाऱ्यांची मते फोडून चौथा उमेदवार निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.

निवृत्त होणारे सदस्य

उपसभापती नीलम गोऱ्हे (शिवसेना), हेमंत टकले, आनंद ठाकूर, किरण पावसकर (राष्ट्रवादी), हरिभाऊ राठोड (काँग्रेस), अरुण अडसड, पृथ्वीराज देशमुख, स्मिता वाघ (भाजप). काँग्रेसच्या एका आमदाराने आधीच राजीनामा दिला.