अभ्यासाची उजळणी करता येत नसल्याने चिंताग्रस्त

नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : अभ्यास साहित्य उपलब्ध नाही, असेल तर अभ्यास करायला जागा नाही, जागा असली तर लक्ष विचलित होते आहे आणि परीक्षेला केवळ महिना उरला आहे, अशा स्थितीत सध्या स्पर्धा परीक्षेचे उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी महत्त्वाचा आधार ठरणारी सार्वजनिक ग्रंथालये बंद असल्याने अभ्यासाच्या उजळणीचा कालावधी वाया जात आहे. सर्व व्यवहार सुरू झाले, मग ग्रंथालये बंद ठेवून आमच्यावरच अन्याय का, असा प्रश्न हे उमेदवार विचारत आहेत.

‘राज्य लोकसेवा आयोगा‘च्या परीक्षेचा अभ्यास करणारा हर्षल हजारी दादरला बैठय़ा चाळीत राहातो. सध्या सर्वजण घरी असल्याने अधूनमधून वाद उद्भवतात. त्यामुळे एकाग्रतेने अभ्यास करता येत नाही, असे तो सांगतो. त्याचा मित्र प्रथमेश चव्हाण याची स्थितीही अशीच. घराबाहेर सतत गोंगाट सुरू असतो. सध्या बाहेर लोकांची वर्दळ आणि पाऊस दोन्ही असल्याने अभ्यासासाठी मोकळ्या मैदानात जाता येत नाही. ग्रंथालयाच्या बाहेर जिन्यावर बसून तरी अभ्यास करू द्या, असे प्रथमेश म्हणतो. कु णाल पवार याच्याही घरात पुरेशी जागा नाही. दिवसभरात काही ना काही कामे करावी लागतात, कधी आईला डॉक्टरकडे नेण्यात वेळ जातो. त्यामुळे कु णाल रात्रभर जागून अभ्यास करतो. पण झोप अपूर्ण राहते. व्यायामशाळा, शाळा, महाविद्यालये यांबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, ग्रंथालयांचा उल्लेखच कोणी करत नाही, याबद्दल कु णाल खंत व्यक्त करतो.

‘ग्रंथालयात मर्यादित लोकच येतात. दिवसभर एकाच ठिकाणी बसून आम्ही अभ्यास करतो. एरव्हीही सर्वजण अंतर ठेवूनच बसतात. त्यामुळे एकमेकांशी फारसा संपर्क  येत नाही. दोन-तीन वर्षे अभ्यास के ला तरी नव्या घडामोडी घडत असतात. त्यामुळे अद्ययावत माहिती मिळवत राहाणे गरजेचे असते. सराव प्रश्नपत्रिका सोडवून वेळेचे व्यवस्थापन करावे लागते. मात्र, उजळणीचा कालावधी निघून जातोय‘, असे कु णाल सांगतो. ज्यांच्या गावात अभ्यासासाठी सोयीसुविधा नाहीत असे उमेदवार स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मुंबईत येतात. टाळेबंदीमुळे त्यांना गावी परतावे लागले. त्यांची पुस्तके  ग्रंथालये आणि अभ्यासिकांमध्येच राहिली आहेत. त्यामुळे ऑनलाइन प्रश्नावली, पीडीएफ यांवर अवलंबून राहावे लागत आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महिला उमेदवारांची अवस्था त्याहून वाईट आहे. घरातील कामे, कौटुंबिक जबाबदाऱ्या हे सर्व सांभाळत त्यांना अभ्यास करावा लागत आहे.

‘स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांतील माहिती दरवर्षी अद्ययावत होत असते. त्यामुळे पुस्तके  ग्रंथालयांतून घेतली जातात. पुस्तकांसोबत नियतकालिकोंमधील संदर्भ लेखही वाचता येतात. शिवाय अभ्यासासाठी एकांतही मिळतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी ग्रंथालये उघडण्याबाबत सतत विचारणा करत आहेत’, असे ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया‘चे अधीक्षक सुनील कु बल सांगतात. त्यांच्या सहा अभ्यासिकांमध्ये रोज ३५० ते ४०० जण अभ्यास करतात. ‘स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना सामान्य ज्ञानाची पुस्तके  वाचावी लागतात. पुरेसा अभ्यास न झाल्याने यंदा स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते‘, अशी शक्यता ‘दादर सार्वजनिक वाचनालया‘चे कोषाध्यक्ष मनोहर साळवी यांनी वर्तवली.