गेल्या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा व्हाव्यात- होऊ नयेत-कधी आणि कशा व्हाव्यात यावर खल करण्यात अनेक महिने गेल्याचा फटका आता स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) मुख्य परीक्षेपूर्वी अंतिम वर्षाचे गुणपत्रक सादर करू न शकलेल्या उमेदवारांचे अर्ज रद्द करण्याचे पत्र आयोगाने पाठवले आहे.

गेल्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने टाळेबंदी जाहीर झाली. त्याचबरोबर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरून गोंधळ सुरू झाला. परीक्षांबाबतचा वादंग जवळपास सहा महिने सुरू होता. न्यायालयाच्या आदेशानंतर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तरी त्याच्या नियोजनातही गोंधळ झाला. त्यामुळे दरवर्षीच्या वेळापत्रकानुसार मे महिन्यापर्यंत संपणाऱ्या अंतिम परीक्षा गेल्यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झाल्या. अनेक महिने या गोंधळात गेल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. गेल्यावर्षी (२०१९-२०) अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वी गुणपत्रक सादर न करता आल्याने आता आयोगाने या उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यास सुरुवात केली आहे.

झाले काय?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये विद्यापीठांनी परीक्षेचे नियोजन केले. यूपीएससीची पूर्वपरीक्षा तोपर्यंत झाली होती आणि मुख्य परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. त्यामुळे मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वी अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक मिळू शकले नाही.

उमेदवारांची न्यायालयात धाव

राज्यातील काही उमेदवारांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयानेही आयोगाला बाजू स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

आयोगाकडून नोटीस…

उमेदवारांनी आयोगाकडे अर्ज करून गुणपत्रक मिळाले नसल्याचे सांगितले आणि बाकीची आवश्यक कागदपत्रे जोडली. त्यानंतर उमेदवारांचा अर्ज मंजूर करून त्यांना परीक्षा देण्याची परवानगी आयोगाने दिली. गुणपत्रिका मिळाल्यानंतर उमेदवारांनी आयोगाकडे स्वतंत्र अर्ज करून गुणपत्रिका दिल्या. मात्र, आवश्यक कागदपत्रे जोडली नसल्याचे सांगून आयोगाने या उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस पाठवली. त्यावरही उमेदवारांनी घटनाक्रम आणि डिसेंबरअखेरीस मिळालेली गुणपत्रिका जोडून आयोगाला उत्तर दिले. परंतु नियमानुसार मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वी कागदपत्रे सादर करणे आवश्यक असल्याचे कारण देत आयोगाने उमेदवारी रद्द करण्याची पत्रे काही उमेदवारांनी पाठवली आहेत.