लालबाग-वरळीतून मोठय़ा प्रमाणावर रहिवाशांचे नातेवाईक येत असल्याची पोलिसांत तक्रार

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : टाळेबंदीमध्ये सामाजिक अंतराचा नियम पाळताना खरेतर शेजाऱ्यांकडेही जाऊ नये इतके काटेकोर पालन करण्याची अपेक्षा असताना घरात बसून कंटाळलेले अनेक जण मुंबईतल्या मुंबईत नातेवाईकांकडेही जाऊन राहत असल्याचे प्रकार पुढे येऊ लागले आहेत. शीव येथील प्रतीक्षानगरमध्ये अशा आगंतुक नातेवाईकांचा बंदोबस्त करण्यासाठी रहिवाशांनी पोलीस ठाण्यातच धाव घेतली आहे.

टाळेबंदीमुळे अनेकांना घरात बसून इतका कंटाळा आलाय की बाहेर पडण्यासाठी लोक निमित्त शोधू लागले आहेत. अनेक जण भाजीची पिशवी घेऊन परिसरातच आपल्या जवळच्या नातेवाईकांकडेही जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यातही एखाद्या परिसरात रुग्ण वाढले की तिथले लोक दुसऱ्या भागात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे जाण्याचा प्रयत्न करतात. प्रतीक्षानगर परिसरात गेल्या काही दिवसांत बाहेरून रहिवाशांचे नातेवाईक येथे आल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

म्हाडाच्या टॉवरमध्ये विलगीकरण कक्ष

प्रतीक्षानगर परिसरात २२ मजली म्हाडाच्या टॉवरमध्ये विलगीकरण कक्ष पालिकेने सुरू केल्यामुळे येथील रहिवासी संतापले आहेत. या इमारतीत रोज नवीन संशयित रुग्ण येतात. दररोज रात्री मोठय़ा संख्येने रुग्णवाहिका येत असल्याचे येथील रहिवासी सांगतात. तर या विलगीकरण कक्षात असलेले संशयित रुग्ण रोज संध्याकाळी इमारतीच्या खाली येऊन एकत्र गप्पा मारत बसतात, असेही काही रहिवाशांचे म्हणणे आहे. तर काही रुग्णांचे नातेवाईक त्यांना जेवण, कपडे देण्यासाठी येत असल्याचेही रहिवासी सांगतात.

असे पाहुणे येती!

या परिसरात येणाऱ्या नातेवाईकांची कारणेही हास्यास्पद आहेत. वरळीत राहणारी एक बाई तिच्या मुलीला घेऊन आली होती. तिच्या मुलीला ताप येत होता. हे समजताच रहिवाशांनी रस्त्यावर येऊन गोंधळ घातला. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर आरोग्यसेविकांनी तिची तपासणी व पुढील कारवाई केली. एका इमारतीत फक्त वृद्ध जोडपे राहत असल्यामुळे त्यांचे चार-पाच नातेवाईक कांदिवलीहून गाडीने इथे आले होते. लालबागला लहानशा घरात राहणाऱ्या एका वृद्ध गृहस्थाला इथल्या नातेवाईकांकडे आणून ठेवण्यात आले आहे. तर एक बाई चक्क आपल्या पतीशी भांडून माहेरी आली आहे. असे एक ना अनेक किस्से या भागात घडत असल्यामुळे नेटाने घरातच राहून नियम पाळणाऱ्या रहिवाशामध्ये असंतोष पसरला आहे.

‘सायन प्रतीक्षानगर सहकारी गृहनिर्माण संस्था’च्या संघटनेने वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्यात याविषयी लेखी तक्रार केली आहे. प्रतीक्षानगरमध्ये येण्याच्या मार्गावर नाकाबंदी करण्याची मागणी रहिवाशांनी केली. मात्र पोलिसांवर आधीच कामाचा ताण असल्यामुळे इथल्या काही रहिवाशांनी मिळून या भागाची नाकाबंदी केली.