इंद्रायणी नार्वेकर

घरकामगारांना मज्जाव करता येणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले असले तरी अनेक ठिकाणी गृहसंकुलांची मनमानी सुरूच आहे. शिवडीतील ‘अशोक गार्डन्स’ या गृहसंकुलात प्रतिबंधित क्षेत्रातील घरकामगारांना मज्जाव केल्याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. तक्रारीनंतर मात्र सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी घरकामगारांना सशर्त परवानगी दिली.

राज्य सरकाने जून महिन्यापासून ‘पुन्हा नव्याने सुरूवात’ या अभियानांतर्गत टाळेबंदी शिथिल केली. घरकामगारांना इमारतींमध्ये प्रवेश द्यावा, अशा सूचनाही सहकार खात्याने दिल्या. त्यानुसार घरकामगार पुन्हा कामावर रुजू होत असताना अनेक ठिकाणी त्यांना मज्जाव होत असल्याचे प्रकार उघडकीस आले. शिवडीतील ‘अशोक गार्डन्स’च्या इमारतींतही असाच प्रकार घडला.

दोन गगनचुंबी इमारती, सहा विंग, प्रत्येक विंगला चार लिफ्ट, तब्बल ७४२ सदनिका अशा ‘अशोक गार्डन्स’ या भव्य गृहसंकुलात हजारो घरकामगार मुंबईच्या विविध भागांतून येतात. करोनाच्या काळात या सर्वाना बंदी होती. मात्र, जूनमध्ये टाळेबंदी शिथिल केल्यानंतर घरकामगारांना इमारतींत प्रवेश देण्यात आला. मात्र, शिवडीतील गणेशबाग आणि गोपाळबाग या परिसरातील कामगारांना या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी मनाई केली होती. हे दोन्ही भाग पालिकेच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या यादीत असल्यामुळे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.

सोसायटीतील काही रहिवाशांना मदतनीस आणि कामगारांना काम हवे होते. मात्र, पदाधिकाऱ्यांनी या कामगारांना येण्यास मनाई केली होती. प्रकरण प्रचंड ताणल्यानंतर स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी पदाधिकाऱ्यांची आणि पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महिनाभर पदाधिकाऱ्यांची मनधरणी केल्यानंतरही पदाधिकारी जुमानत ५ ुनसल्यामुळे पडवळ यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पालिकेच्या विभाग कार्यालयानेही पोलीस ठाण्याला पत्र लिहून कारवाई करण्याबाबत कळवले होते.

शिवडी परिसराच्या निम्म्या भागाइतका गणेशबाग आणि गोपाळबागचा परिसर आहे. प्रतिबंधित क्षेत्राच्या नव्या नियमानुसार पालिकेने हा संपूर्ण भाग प्रतिबंधित म्हणून नमूद केला होता. प्रतिबंधित क्षेत्राची यादी पाहून सोसायटीने या भागातील नागरिकांना कामावर येण्यास मनाई केली होती. याबाबत सहाय्यक आयुक्तांकडे, पोलीस ठाण्यातही पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. मात्र, पदाधिकारी ऐकत नसल्यामुळे तक्रार केल्याची माहिती पडवळ यांनी दिली.

गणेशबाग रहिवासी संघाचे पदाधिकारी प्रवीण घाटे म्हणाले की, गणेशबागमध्ये ३४७ घरे आहेत. यापैकी किमान ६० ते ७० जण ‘अशोक गार्डन्स’मध्ये विविध प्रकारची कामे करतात. त्यात घरकाम, सुरक्षा रक्षक, वाहन चालक, गाडय़ा धुणे अशी कामे करणाऱ्यांचा समावेश आहे.

हातावर पोट असलेल्यांचा रोजगार बुडत असल्यामुळे हे कामगार हवालदिल झाले होते. त्यामुळे गणेशबागमध्ये किती रुग्ण होते, आताची स्थिती काय आहे याबाबतचे लेखी पत्र पदाधिकाऱ्यांना दिले. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. मात्र, गुरुवारपासून सोसायटीने कामगारांना इमारतींत प्रवेश देण्याची तयारी दाखवली, असे घाटे यांनी सांगितले.

घरकामगारांसाठी स्वतंत्र लिफ्ट

’‘अशोक गार्डन्स’मध्ये घरकामगारांना आधीच ओळखपत्रे दिलेली आहेत. टाळेबंदी शिथिल केल्यानंतर ज्या घरमालकांनी आपल्या मदतनीसांना बोलावण्याबाबत कळवले होते, त्यांच्याच घरकामगारांना प्रवेश दिला जात आहे. त्यानुसार आतापर्यंत ४०० मदतनीसांना प्रवेश देण्यात आला आहे.

’गणेशबागमधील २० जणांना प्रवेश दिला आहे. कामगारांनी आपले वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर रोज त्यांचे तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासली जाते. त्यांचे हात, पाय, चपला र्निजतूक केल्या जातात. त्यांना व बाहेरील कोणासाठीही जाण्यायेण्यासाठी प्रत्येक विंगमध्ये स्वतंत्र लिफ्ट राखीव आहे.

पालिकेच्या प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीत गणेशबाग आणि गोपाळबाग ही नावे आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना मज्जाव केला. राज्य सरकारच्या नियमांचे उल्लंघन केल्यास पदाधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, म्हणून आम्ही ही खबरदारी घेतली होती. मात्र, या ठिकाणी एकही रुग्ण नसल्याचे विभाग कार्यालयाने कळवल्याने आम्ही गणेशबागमधील कामगारांना इमारतींत प्रवेश द्यायला सुरूवात केली आहे.

– गौतम देशपांडे, पदाधिकारी, अशोक गार्डन्स