शिक्षणसंस्था आणि पालकांमध्ये शालेय शुल्कावरून सुरू असलेला वाद अधिकच चिघळला आहे. शाळांनी ऑनलाइन वर्गातून विद्यार्थ्यांना काढून टाकल्याची तक्रार पालक संघटनेने केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर येथील ७४ शाळांबाबत शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे पालकांनी तक्रार केली.

शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी अनेक सुविधा वापरत नाहीत. असे असतानाही शाळा भरमसाट शुल्क आकारत असल्याची तक्रार पालक सातत्याने करत आहेत. त्याचवेळी शुल्क घेतले नाही तर शाळेची देखभाल, शिक्षकांचे वेतन हा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न शिक्षण संस्था विचारात आहेत. पालक आणि शिक्षण संस्थांची संघटना अशा दोन्ही स्तरावर आंदोलने सुरू आहेत. शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण शाळा बंद करत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. राज्यातील अशा ७४ शाळांची तक्रार पालकांनी केली आहे. इंडिया वाईड परेन्ट्स असोसिएशन या संघटनेने तक्रार केली आहे.

तक्रार कुणाची?

पालकांनी तक्रार केलेल्या शाळांमध्ये बहुतेक इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा आहेत. काही देशपातळीवरील संस्था आहेत. त्यात मुंबई, ठाण्यातील ३४, पुणे आणि पिंपरी— चिंचवडमधील २८, नागपूरमधील १२ तर गोंदिया येथील ३ शाळांची नावे आहेत.

आक्षेप काय?

काही शाळा अवाजवी शुल्क मागत आहेत. शुल्क एकरकमी भरण्यात यावे अशी सक्ती करत आहेत. शुल्क भरण्यासाठी कर्ज काढण्याचा सल्ला शाळा व्यवस्थापन देत आहे. शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात सामावून घेण्यात येत नाही. मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येत आहे.