मुलुंड येथील एका सौंदर्य प्रसाधन कंपनीचे संचालक असलेल्या अंकुर कोराने यांनी कंपनी स्थापन करण्यासाठी एक कोटीच्या जवळपास कर्ज घेतले होते. त्याच रकमेवर आरोपींना गंडा घातल्याचे स्पष्ट झाले झाले. एक कोटी रक्कम हस्तांतरित झाली असली तरी ५३ लाख रुपये वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र उर्वरित ४७ लाख वसूल करण्यासाठी मुलुंड पोलिसांची पथके उत्तर प्रदेशात रवाना झाली आहे. या आरोपींना लवकरच अटक होईल, अशी आशा पोलिसांनी वर्तविली आहे.
कोराने यांचे मुलुंडच्या एस बँकेत खाते आहे. या खात्यातूनच एक कोटीची रक्कम वळती झाली आहे. असे असतानाही बँकेचा काहीही संबंध नाही, अशी भूमिका बँकेने घेतली असली तरी आम्ही बँकेच्या सहभागाची चौकशी करीत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एवढी मोठी रक्कम केवळ ४५ मिनिटांत १२ वेगवेगळ्या खात्यात हस्तांतरित होते. तरीही बँक जर ही जबाबदारी घेण्यास तयार नसेल तर बँकेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
आपल्या खात्यातून एक कोटी हस्तांतरित झाल्याची बाब कोराने यांनी प्रत्यक्षात बँकेत जाऊन निदर्शनास आणून दिल्यानंतरही बँकेचा थंड प्रतिसाद होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला तरच आपण काही करू शकतो, अशी भूमिका बँकेने घेतली. वास्तविक त्याचवेळी बँकेने काही काळापुरती ही रक्कम थांबविली असती तर कदाचित एक कोटी रुपये वाचू शकले असते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. परंतु बँकेकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे कोरानेही अचंबित झाले होते. त्यानंतर सायबर पोलीस ठाणे आणि मुलुंड पोलीस ठाणे असता प्रवास करताना दोन तासांचा कालावधी वाया गेला आणि त्यामुळे चोरटय़ांनी ४७ लाख काढून घेतले, असेही आढळून आले आहे.
कोराने यांना एक कोटीचे कर्ज मिळाल्याची कल्पना ज्यांना होती त्यांची माहितीही पोलिसांनी मिळविली आहे. याशिवाय बँकेतील काही कर्मचाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलाविले जाणार आहे. उत्तर प्रदेशातील ज्या चार खात्यांत पैसे हस्तांतरित झाले होते तेथे काही तासांत मोठी रक्कम रोखीने काढू देण्यास बँकेने परवानगी कशी दिली याचीही चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे तेथील काही कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे. या मागचा मुख्य सूत्रधार वेगळाच असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.