रुग्णाच्या नातेवाईकांची पायपीट; जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी

शैलजा तिवले

करोनावर प्रभावी मानल्या जाणारे रेमेडेसिवीर इंजेक्शनचा सध्या बाजारात तुटवडा असल्याने ती मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना पायपीट करावी लागत आहे. मुंबईत काही ठिकाणी मात्र चढय़ा दराने याची विक्री होत असल्याच्याही तक्रारी येत आहेत.

रेमेडेसिवीरच्या उत्पादनाला तीन भारतीय कंपन्यांना परवानगी मिळाली असून यातील सिप्ला आणि हेट्रो यांनी उत्पादन सुरू केले आहे. परंतु मागणी तितका पुरवठा होत नसल्याने सध्या बाजारात उपलब्ध नाही.  शुक्रवारी दिवसभर २० हून अधिक औषध वितरकांशी बोलून मिळण्याचा प्रयत्न केले. परंतु औषध नाही असेच उत्तर मिळाले.

इथे अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना रेमेडेसिवीर आणायलाही सांगितले आहे. परंतु मिळतच नसल्याने तेही माझ्यासारखे फिरत आहे’, असे भिवंडीचे नवीन तिवारी यांनी सांगितले.

काही रुग्णालयांच्या औषध दुकांनामध्ये उपलब्ध असल्याचे समजले. दुकानांमध्ये गेल्यावर काही वितरकांनी याचा साठा केल्याचे समजले. आठ हजार रुपयांना एक कुपी अशा चढय़ा दराने विक्री के ल्याचे आढळले.

रेमडेसिवीरच्या एका कुपीची किंमत सरकारी रुग्णालयांसाठी ४,१४४ रुपये आहे, तर खासगी रुग्णालयांना ५,४०० रुपयांना मिळते. हेट्रो

हेल्थकेअर कंपनीने २० हजार कुप्या दोन आठवडय़ापूर्वी देशभरात उपलब्ध केल्या होत्या. मुंबईतील नामांकित चार रुग्णालयांनी मोठय़ा प्रमाणात कंपनीतून हे औषध मागविले होते आणि त्यांना त्या तातडीने उपलब्धही झाल्या. परंतु राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेचे गाडे निविदा प्रक्रियेतच अडकल्याने यातील एकही कुपी सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होऊ शकली नाही.

पालिकेने नुकतीच याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून १५ हजार कुप्यांची मागणी हेट्रोकडे केली आहे.

कंपनीतून आम्हालाही अगदी थोडय़ा प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध होते. त्यामुळे ज्या रुग्णांना आवश्यकता असते आणि उपलब्ध नसते. अशा वेळेस त्यांच्या नातेवाईकांना आम्ही चिठ्ठी लिहून देतो आणि वितरकांचे संपर्क क्रमांकही देतो. जेणेकरून त्यांना मिळवता आले, तर ते घेऊन येतात, असे लीलावती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन.रविशंकर यांनी सांगितले.

तक्रार केल्यास कारवाई

हेट्रोने पुरवठा केला तेव्हा काही खासगी रुग्णालयांच्या औषध दुकांनामध्ये इंजेक्शन मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होते. परंतु आता कंपनीतून पुरवठा होत नसल्याने पुन्हा तुटवडा निर्माण झाला आहे. चढय़ा दराने विक्री होत असल्यास याची माहिती आमच्यापर्यत द्या. आम्ही लगेचच कारवाई करू, असे अन्न व ओषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त जे.बी.मंत्री यांनी सांगितले.

१० जुलैनंतर एक लाख कुप्यांचा पुरवठा

सध्या मागणी मोठय़ा प्रमाणात असल्याने उत्पादनही वाढविले आहे. १० जुलैनंतर एक लाख कुप्या मागणीनुसार पुरविल्या जाणार आहेत,असे हेट्रो हेल्थकेअर कंपनीने सांगितले आहे. आपत्कालीन स्थितीत डॉक्टर किंवा रुग्णालयांनी १८०० १०३ ४६९६ या टोल फ्री क्रमांकावर  संपर्क करण्याची सूचना कंपनीने केली आहे.