राज्यात काळ्या काचा असणाऱ्या वाहनांविरोधात विशेष मोहीम

वाहनांना काळ्या फिल्म बसविणे हे शासनाच्या नियमाविरोधात असूनही काही वाहनचालकांकडून त्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. याविरोधात १९ मार्चपासून घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत राज्यात ९३४ वाहने दोषी आढळली आहेत. यातील ५९० वाहनांवरील काळ्या फिल्म काढून टाकण्यात आल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. त्याचप्रमाणे आकारण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईत दोन लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहनांच्या काचांवर काळ्या फिल्म बसविणे हे नियमांत नाही. तरीही अनेक वाहनचालक काचांना काळ्या फिल्म बसवितात. त्यामुळे वाहन कोण चालवीत आहे किंवा वाहनांत अन्य व्यक्ती कोण आहेत हे समजत नाही. सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक असल्याने काळ्या फिल्म बसविणाऱ्या वाहनांविरोधात कारवाई करता येते. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून राज्यात १९ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत विशेष मोहिमेद्वारे काळ्या काचा बसविलेल्या वाहनांविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. एकूण पाच हजार ३७० वाहने तपासण्यात आली असता ९३४ वाहनांना काळ्या फिल्म बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले. मुंबईत २५ तर ठाणे, कल्याण, वाशी, वसई भागांत २० वाहने दोषी आढळली. नाशिक, अहमदनगर, श्रीरामपूर आणि मालेगाव भागात एकूण सर्वाधिक १५७ तर पुणे, सोलापूर, चिंचवड, बारामती, अकलूजमध्ये ११७ त्याखालोखाल पनवेल, पेण, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत एकूण ११६ वाहने आढळली आहेत. राज्यातील अन्य भागांतही काळ्या फिल्म असलेली वाहने आढळल्याचे सांगण्यात आले.

वाहनांच्या काचांवर काळ्या फिल्म बसविणाऱ्या वाहनांवर अवघी २०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाते. जर दंड भरला नाही तर वाहनचालकाचा परवाना किंवा अन्य कागदपत्रही जप्त केली जातात.

काचांना काळ्या फिल्म बसविणाऱ्या वाहनांविरोधात विशेष मोहीम आखण्यात आली होती. यात ९३४ वाहने दोषी आढळली आहेत. काळ्या फिल्म बसविणे हे मुळातच शासनाच्या नियमाविरोधात आहे. अशा वाहनांविरोधात कारवाई करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आदेशच आहेत.    – राजेंद्र मदणे,  परिवहन उपायुक्त, अंमलबजावणी