मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

मुंबई : पुणे महानगर परिसराच्या (पीएमआरडीए) विकासासाठी असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करावे. विकास प्रकल्पांची कामे करताना महापालिकेच्या समन्वयातून त्याची अंमलबजावणी करावी. शहराचे सौंदर्य देखील जपावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. हिंजवडी ते शिवाजी नगर मेट्रो तीन वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहितीही यावेळी पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत देण्यात आली.

मंत्रालयात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाचा आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त विक्रमकुमार या वेळी उपस्थित होते.

परिवहन, सामाजिक, पायाभूत सुविधा, पर्यावरण विषयक प्रकल्प आणि नगरविकासाचे नियोजन याबाबतचा मुलभूत प्रस्ताव मांडण्यात आला. पुणे महानगर परिसराचा सर्वंकष वाहतूक आराखडा मांडण्यात आला. पुण्यात सध्या चार चाकी आणि दुचाकी वाहनांचा वापर ७१ टक्के असून तो सार्वजनिक वाहतूक सुविधांच्या माध्यमातून कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.

‘मेट्रो’साठी प्राधान्य

सर्वंकष वाहतूक आराखडय़ाची चार टप्प्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. तातडीच्या उपाययोजनेमध्ये पहिल्या तीन मेट्रो मार्गिका कार्यरत करण्यात येणार आहेत. हिंजवडी ते शिवाजी नगर मेट्रो मार्ग तीन येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. मेट्रोसाठी भूसंपादन, वर्तुळाकार बाह्य़ वळण रस्ता, पाणी पुरवठा योजना, विकास आराखडा, प्रादेशिक योजनांचा आराखडा, नगररचना योजना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, परवडणारी घरे याबाबत आढावा या वेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला.