राज्य मंत्रमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच, बारावीच्या परीक्षा ठरल्यानुसार मे महिन्यात घेतल्या जाणार आहेत. मात्र, यासोबतच राज्यात आता कठोर लॉकडाउन लागू केला जाणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात नेमका कधीपासून लॉकडाउन लागू केला जाणार? नव्या लॉकडाउननंतर आत्तापर्यंत लागू करण्यात आलेल्या नियमांचं काय होणार? असे प्रश्न देखील विचारले जाऊ लागले आहेत. त्यावर आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

लॉकडाऊनवर मुख्यमंत्री बोलतील…!

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अनिल परब यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. “मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वच मंत्र्यांनी लॉकडाउनबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. कशावर कडक निर्बंध लागू केले जातील, त्यावर आज चर्चा झाली आहे. त्यासंदर्भात अधिकृत घोषणा उद्या मुख्यमंत्री करतील. त्यानंतर आज जाहीर केलेले आदेश रद्द होतील”, असं परब यांनी सांगितलं.

राज्यात येत्या काही तासांत संपूर्ण लॉकडाउनची घोषणा – अस्लम शेख

रुग्णसंख्येला आळा घालायचा असेल तर…

“कडक निर्बंध लावून देखील करोना नियंत्रणात येत नाहीये. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जनता रस्त्यावर फिरते आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातल्या निर्णयाविषयी मुख्यमंत्री सविस्तर भूमिका उद्या मांडतील. त्यानंतर मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जातील. सध्या रुग्णांची संख्या प्रमाणाबाहेर वाढत चालली आहे. औषधांचा, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे रुग्णसंख्येला आळा घालायचा असेल, तर लोकांना एकमेकांच्या जवळ न येऊ देणं हा त्यावरचा पर्याय आहे”, असं देखील अनिल परब यांनी यावेळी सांगितलं.

SSC Exams – राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द! राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय!

 

“आरोग्य कर्मचाऱ्यांच्याही मर्यादा आहेत”

“रुग्णांची संख्या प्रमाणाबाहेर जात आहे. त्यासाठी लागणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांची एक मर्यादा असते. गेलं वर्षभर ते काम करत आहेत. त्यांच्याही काही मर्यादा आहेत. करोनाची साखळी तोडायची असेल, तर लॉकडाउनशिवाय पर्याय नाही. अत्यावश्यक सेवा नक्कीच लोकांना मिळतील. कुठेही लोकांना अडचण येणार नाही. पण त्या कशा मिळतील, याची पद्धत ठरवली जाईल”, असं अनिल परब यांनी यावेळी स्पष्ट केलं.