करोना रुग्णांची वाढती संख्या व प्रसाराची साखळी तोडण्यासाठी राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला जात आहे. इतर शहरांपाठोपाठ नवी मुंबईतही लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. ४ जुलैपासून ते १३ जुलैपर्यंत नवी मुंबईत लॉकडाउन असणार आहे. या काळात एपीएमसी मार्केट सुरू राहणार आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील दुकानं, ठाणे व बेलापूर येथील औद्योगिक वसाहतीही सुरू ठेवण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी याविषयी माहिती दिली.

करोनाचा शिरकाव होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरी, राज्यातील संसर्गाची साखळी अद्याप तुटल्याचं दिसत नाही. उलट दिवसेंदिवस यात वाढ होत चालली असून, मिशन बिगिन अगेनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात होत असताना अनेक शहरे पुन्हा लॉकडाउनच्या वाटेवर आहेत. वाढती रुग्णसंख्या व करोनाचा प्रसार कायम असल्यानं स्थानिक पातळीवर हा निर्णय प्रशासनाकडून घेतला जात आहे.

नवी मुंबईतही करोना रुग्णांची संख्या वाढत असून, महापालिकेनं दहा दिवसांचा कडक लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. सध्या नवी मुंबईत दिवसाला दोनशे पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे आकडा ६ हजार ८२३ वर पोहोचला आहे. नवी मुंबईत आतापर्यंत करोनामुळे २१७ जणांचा मृत्यू झाला असून, महापालिकेने प्रसार आटोक्यात आणण्यासाठी यापूर्वीच १२ ठिकाणी लॉकडाउन लागू केलेला आहे. मात्र, शहरातील इतर ठिकाणी रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून आल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

४ जुलै ते १३ जुलै या कालावधीमध्ये नवी मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवा देणारी दुकानं सुरू ठेवण्यास मूभा देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या काळात कारण नसताना घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. करोना प्रसाराची साखळी तोडण्यासाठी या काळात महापालिकेच्या वतीनं विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. या लॉकडाउनच्या काळात एपीएमसी मार्केट, ठाणे व बेलापूर औद्योगिक वसाहती सुरू राहणार आहेत.