बीड जिल्ह्य़ातील पोलीस शिपाई ललिता साळवे यांच्यावर शुक्रवारी जननेंद्रिय शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा पार पडला. त्या मुलगा म्हणून जन्माला आल्या असल्या तरी अविकसित जननेंद्रियांमुळे मुलगी म्हणून वाढविलेल्या ललिता यांना आता अखेर ‘ललित’ म्हणून नवी ओळख मिळणार आहे.

बीडमधून पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१० मध्ये साळवे महाराष्ट्र पोलीसमध्ये महिला शिपाई म्हणून रुजू झाल्या. साळवे जन्मत:च मुलगा म्हणून जन्माला आले होते. मात्र त्यांची जननेंद्रिये विकसित न झाल्याने स्त्रीप्रमाणे भासत होती. त्यामुळे घरामध्ये मुलगी समजूनच वाढविण्यात आले. साळवेंची लहानपणापासून मुलगी म्हणून वाढ झाली असली तरी त्यांच्यामध्ये मुलाचे हार्मोन्स असल्याने वयात आल्यानंतर त्यांना आपण मुलगी नसून मुलगा आहोत, असे वाटत होते.

तेव्हा जननेंद्रिय शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी पोलीस खात्याकडे रजेची परवानगी मागितली होती. महिला असून पुरुष असल्याचा त्यांच्या या अजब दाव्यामुळे त्यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर ललिता यांचा ‘ललित’ बनण्यासाठीचा झगडा सुरू झाला. तब्बल वर्षभराच्या प्रयत्नानंतर विशेष बाब म्हणून त्यांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी मिळाली. शुक्रवारी या शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा सेंट जॉर्ज रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन डॉ. रजत कपूर व त्यांच्या चमूने पूर्ण केला.

साधारण तीन महिन्यांनंतर साळवे यांच्यामध्ये शुक्राणूंची निर्मिती होते का याची तपासणी केली जाईल. त्यानंतर पुढील शस्त्रक्रिया करण्यात येतील. पुरुषांप्रमाणे दाढीमिशा येण्यासाठी पुढील काळात त्यांच्यावर केसरोपणही केले जाणार आहे. त्यामुळे ललिता लवकरच ‘ललित’ म्हणून नवी ओळख घेऊन सर्वसामान्य आयुष्य सुरू करतील, असेही पुढे डॉ. कपूर म्हणाले.

सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये अशी शस्त्रक्रिया प्रथमच होत आहे. शस्त्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये सुमारे एक ते दीड लाख खर्च येतो, तर सरकारी रुग्णालयामध्ये दोन ते तीन हजारांमध्ये केली जाते. साळवे यांच्यावर मात्र ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याचे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले.

जनुकीय तसेच गुणसूत्राच्या तपासण्यांमध्ये साळवे हे पुरुष असल्याचे निष्पन्न झाले. साळवे यांच्यामध्ये महिलांप्रमाणे स्तन, अंडाशय हे अवयव नाहीत. त्यांची जननेंद्रिये अविकसित असल्याने ती स्त्रीप्रमाणे भासत होती. त्यामुळे ही शस्त्रक्रिया लिंगबदलाची नाही.   – डॉ. रजत कपूर, प्लास्टिक सर्जन, सेंट जॉर्ज रुग्णालय