गृहविलगीकरणात असलेल्या १४,८०० करोनाबाधित रुग्णांवरील उपचार पूर्ण झाले आहेत. घरीच उपचार घेणाऱ्या या रुग्णांच्या प्रकृतीचा पाठपुरावा करण्यासाठी महापालिकेने ‘प्रकल्प मैत्री’ ही संकल्पना राबवली होती. या प्रकल्पातून आलेल्या अनुभवांची माहिती इतर शहरांना आणि जिल्हा प्रशासनांना कळविण्यात येणार आहे.
ज्या करोनाबाधित रुग्णांना गृहविलगीकरणाची अनुमती देण्यात आली आहे, अशा रुग्णांचा नियमितपणे पाठपुरावा करणे गरजेचे असते. त्याचबरोबर या रुग्णांपैकी काही रुग्णांवर औषधोपचार करणेही गरजेचे असते. त्यामुळे या रुग्णांना दररोज दूरध्वनीद्वारे पाठपुरावा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘प्रकल्प मैत्री’ची सुरुवात जुलैमध्ये केली होती. ‘प्रकल्प मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेच्या आणि ‘पोर्टीया मेडिकल’ या संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या प्रकल्पांतर्गत आजवर २१ हजार २५० रुग्णांशी संपर्क साधण्यात आला आहे, तर यापैकी १४ हजार ८०० रुग्णांवरील उपचार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
प्रकल्प मैत्री या संकल्पनेअंतर्गत गृहविलगीकरणात असलेल्या करोना रुग्णांशी प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी नियमितपणे दूरध्वनीद्वारे संवाद साधतात. याअंतर्गत प्रामुख्याने उपचारविषयक पाठपुरावा घेणे, तसेच रुग्ण व त्याच्या कुटुंबीयाची आरोग्य स्थिती जाणून घेतली जाते. रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांना मानसिक आरोग्यविषयक समुपदेशकांशी व भावनाविषयक तज्ज्ञांशी संवाद साधण्याची सुविधा १८००-१०२-४०४० या क्रमांकावर उपलब्ध करून देण्यात येते.
रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेल्या, परंतु ७ दिवसांसाठी गृहविलगीकरणाची शिफारस करण्यात आलेल्या रुग्णांचादेखील या प्रकल्पांतर्गत नियमित पाठपुरावा करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 1, 2020 12:18 am