कृषी विभागाच्या चाचणीनंतर परवानगी

मुंबई : सोसायटय़ांना स्वत:च्या कचऱ्यापासून निर्माण केलेल्या खताची थेट बाजारपेठेत विक्री करता येणार आहे. मात्र त्यासाठी सोसायटय़ांना कृषी विभागाच्या प्रयोगशाळेत खताची चाचणी करावी लागणार असून केवळ उच्च दर्जाच्या खताची थेट विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे उच्च दर्जाच्या खताची विक्री करण्यासाठी सोसायटय़ांना खतनिर्मिती कंपन्यांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही.

कचराभूमींवरील कचऱ्याचा भार हलका व्हावा या उद्देशाने पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर उभ्या असलेल्या, तसेच प्रतिदिन १०० किलो कचरा निर्माण होत असलेल्या सोसायटय़ांना स्वत:च्या ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणे बंधनकारक केले आहे. मुंबईमध्ये २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर उभ्या असलेल्या आणि प्रतिदिन १०० किलो कचरा निर्माण होत असलेल्या सोसायटय़ांची संख्या सुमारे ३३००च्या आसपास आहे. या सर्व सोसायटय़ांना कचऱ्यापासून खतनिर्मिती करणे बंधनकारक आहे. मात्र त्यापैकी केवळ एक हजार सोसायटय़ांनी कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. या सोसायटय़ांमध्ये निर्माण होत असलेल्या एक हजार मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून १५० मेट्रीक टन खतनिर्मिती करण्यात येत आहे, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

सोसायटय़ांनी तयार केलेले खत राष्ट्रीय केमिकल अ‍ॅण्ड फर्टिलायजर्स लिमिटेड कंपनी (आरसीएफ)मार्फत खरेदी करण्याचा विचार पालिका प्रशासन पातळीवर सुरू होता. मात्र सोसायटय़ांना स्वनिर्मित खत थेट बाजारातही विक्री करता येणार आहे. मात्र तत्पूर्वी सोसायटय़ांना कचऱ्यापासून निर्माण केलेल्या खताची कृषी विभागाच्या प्रयोगशाळेमध्ये चाचणी करावी लागणार आहे. प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या चाचणीमध्ये खत विषारी घटक आणि धातूमुक्त असावे लागणार आहे. तसेच खतनिर्मिती कंपनीच्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय मानकानुसार असणाऱ्या खताचीच सोसायटय़ांना थेट बाजारात विक्री करता येईल.

काही सोसायटय़ांनी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी यंत्रे बसविली आहेत. आवश्यक ती प्रक्रिया न करताच या यंत्रामध्ये ओला कचरा टाकून खतनिर्मिती केली जात आहे. आवश्यक ती प्रक्रिया न केल्यामुळे यंत्रामध्ये केवळ कचऱ्याचा भुसा तयार होत आहे. या भुशावर १५-२० दिवसांची प्रक्रिया केल्यानंतरही चांगल्या दर्जाचे खत तयार होऊ शकते, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. नैसर्गिकरीत्या ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करताना नारळाच्या झावळ्या, झाडाच्या फांद्या यांचा भुसा करून त्यात मिसळला जातो. त्याच धर्तीवर यंत्रामध्ये तयार होणाऱ्या भुशामध्ये ओला कचरा मिसळून ते मिश्रण १५ ते २० दिवस प्रक्रिया होण्यासाठी ठेवावे लागेल. तरच त्यातून चागंले खत तयार होऊ शकेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

गृहनिर्माण सोसायटय़ांनी ‘फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर’मधील मानकानुसार निर्माण केलेले खत थेट बाजारात विकणे शक्य आहे.

– विश्वास शंकरवार, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन