जागा नसलेल्या सोसायटय़ा, हॉटेलांना मुंबई महापालिकेचा पर्याय

दरदिवशी १०० किलोपेक्षा अधिक कचऱ्याची निर्माण होत असतानाही जागेअभावी खतनिर्मितीसाठी यंत्रणा उभारणे शक्य होत नाही. त्यामुळे मुंबईमधील अनेक सोसायटय़ा आणि हॉटेल मालक चिंतित झाले आहेत. यावर तोडगा म्हणून पालिकेच्या मंडयांमध्ये खतनिर्मिती यंत्रणा उभारून तेथे सोसायटय़ा आणि मंडईतील कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा विचार पालिका प्रशासन करीत

आहे. मात्र अशा सोसायटय़ा आणि हॉटेलांना खतनिर्मिती यंत्रणा उभारण्यासाठी पालिकेला निधी द्यावा लागणार आहे.

दरदिवशी १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होत असलेल्या, तसेच २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर उभ्या असलेल्या सोसायटय़ा, हॉटेल्स, मॉल्स आदींना ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचे आदेश महापालिका आयुक्त  अजोय मेहता यांनी दिले होते. सोसायटय़ांना खतनिर्मितीची यंत्रणा उभारण्यास २ ऑक्टोबपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र बहुसंख्य सोसायटय़ा आणि हॉटेल्सना जागेअभावी खतनिर्मितीची यंत्रणा उभारणे शक्य झालेले नाही.

मुंबईमध्ये दाटीवाटीने चाळी, सोसायटय़ा उभ्या आहेत. तसेच इंच इंच जागेचा वापर करून हॉटेलांमध्ये ग्राहकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात येते. अशा चाळी, सोसायटय़ा आणि हॉटेलांची संख्या मोठी असून खतनिर्मितीच्या बाबतीत या चाळी, सोसायटय़ा व हॉटेले पालिकेसाठी डोकेदुखी बनले आहेत.

जागेअभावी खतनिर्मिती करण्यास असमर्थ ठरलेल्या चाळी, सोसायटय़ा आणि हॉटेल्ससाठी पालिकेच्या एच-पश्चिम विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांनी एक पर्याय सुचविला आहे.

मुंबईत पालिकेच्या ९२ मंडया आहेत. या मंडयांमध्ये दरदिवशी १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. त्यामुळे या मंडयांमध्ये खतनिर्मिती यंत्रणा उभारण्यात येणार आहे. काही मंडयांमध्ये यापूर्वीच खतनिर्मितीला सुरुवात  झाली आहे, तर काही मंडयांत ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. जागेअभावी खतनिर्मिती यंत्रणा उभी करू न शकणाऱ्या चाळी, सोसायटय़ा आणि हॉटेल्समधील कचऱ्याची परिसरातील मंडयांमध्ये विल्हेवाट लावण्याचा पर्याय शरद उघाडे यांनी सुचविला आहे.

पालिका खर्च वसूल करणार

* चाळी, सोसायटय़ा आणि हॉटेलांना स्वत:च्या जागेत खतनिर्मिती यंत्रणा उभी करण्यासाठी खर्च येणार आहे. त्यामुळे जागा नसलेल्या चाळी, सोसायटय़ा व हॉटेलांनी हाच निधी सामाजिक बांधिलकी म्हणून पालिकेला उपलब्ध केल्यास मंडईमध्ये खतनिर्मिती यंत्रणा उभरता येईल आणि निधी उपलब्ध करणाऱ्यांच्या कचऱ्यापासून तेथे खतनिर्मिती करता येईल. तसेच मंडईमधील कचऱ्याचीही विल्हेवाट लावणे पालिकेला शक्य होईल.

* या पर्यायामुळे खतनिर्मिती यंत्रणा उभारण्यासाठी जागा नसलेल्या चाळी, सोसायटय़ा, हॉटेल्सबरोबर मंडईतील कचऱ्याचाही प्रश्न सुटू शकेल. या दृष्टीने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंडईच्या आसपास मोठय़ा प्रमाणात कचरा निर्माण होत असलेल्या, मात्र जागा नसलेल्या चाळी, सोसायटय़ा आणि हॉटेल्सशी संपर्क साधून त्यांच्या पुढे नवा पर्याय ठेवण्यास सुरुवात केली आहे.  याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

जागा नसलेल्या आणि मंडईच्या आसपास असलेल्या चाळी, सोसायटय़ा आणि हॉटेलांसाठी मंडईतच खतनिर्मिती यंत्रणा उभारण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. स्वत:ची खतनिर्मिती यंत्रणा उभारण्यासाठी पैसे खर्च करावेच लागणार आहेत. हा निधी सामाजिक बांधिलकी म्हणून पालिकेला द्यावा. 

– अजोय मेहता, मुंबई महापालिका आयुक्त