रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची ग्वाही; रेल्वे, महामार्गाचे जाळे विस्तारण्यावर केंद्राचा भर

केंद्रीय अर्थसंकल्पात उपनगरीय लोकल सेवा अधिक सक्षम आणि आरामदायी करण्यासाठी भरीव तरतूद करण्यात येईल, असा दावा रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी केला. स्टेशन मास्तर ते सफाई कामगारांपर्यंत सर्व जबाबदारी महिलांवर असलेल्या माटुंगा रेल्वे स्थानकाला गोयल यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.

संपूर्ण कार्यभार महिलांवर असलेले माटुंगा हे देशातील एकमेव रेल्वे स्थानक आहे. या खुबीमुळे अलीकडेच स्थानकाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली. येथील महिला अधिकारी, कर्मचारी, कामगारांना गोयल यांनी शुभेच्छा दिल्या. त्यासोबत लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावर विशेष लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. लोकलमधील महिलांसाठी आरक्षित डब्यात सीसीटीव्ही यंत्रणा उभारणी, राज्य रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांचा समन्वय आणि अद्ययावत तंत्रज्ञान याची सांगड घालून महिला सुरक्षेबाबत योग्य ती व्यूहरचना आखली जाईल, असे गोयल यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सहून लोकलने माटुंगा स्थानकात आलेल्या गोयल यांनी मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यानची सहावी मार्गिका २०२२मध्ये सुरू करण्याचे आश्वासन दिले. प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने रेल्वे आणि महामार्गाचे जाळे विस्तारण्यावर केंद्र सरकारचा विशेष भर आहे. रेल्वे, महामार्ग पूरक आहेत. त्यामुळे महामार्ग, रेल्वे रूळ शेजारी किंवा जवळपास असल्यास प्रवाशांना सोयीचे ठरू शकेल, असेही त्यांनी सांगितले.