News Flash

महिलांच्या स्वच्छतागृहासाठी सर्वसमावेशक योजना आखावी

समितीत महिला नगरसेवकांचा समावेश असावा.

उच्च न्यायालयाचे सर्व पालिकांना आदेश
गर्दीच्या ठिकाणी, रस्त्याच्या दुतर्फा, बस-रेल्वे-टॅक्सी-रिक्षा स्टॅण्ड, सरकारी-पालिका कार्यालये यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ वा स्वच्छतागृहे उपलब्ध होणे महिलांचा मूलभूत अधिकार आहे. शिवाय आवश्यक सुविधा म्हणून पालिकांनी ही स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे त्यांचे कर्तव्य असून आपल्या घटनात्मक जबाबदारीपासून ते हात झटकू शकत नाही, असे स्पष्ट करत महिलांसाठीची स्वच्छतागृहे बांधणे आणि त्याची देखभाल करण्याबाबत सर्वसमावेशक योजना तयार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी सर्व पालिकांना दिले आहेत. एवढेच नव्हे, तर त्यासाठी चार आठवडय़ांत विशेष समिती स्थापन करण्याचे बजावताना पालिकांना ३३ कलमी नियमावलीही आखून दिली आहे. विशेष म्हणजे महिलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करताना त्यांच्या संख्येऐवजी त्यांच्या गरजेचे प्रामुख्याने विचार करावा, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.
नोकरी वा कामानिमित्त घराबाहेर असलेल्या महिलांसाठी आवश्यक ती स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्याने महिलांची कुचंबणा होते. हा मुद्दा ‘मिळून साऱ्याजणी’ या पुणेस्थित स्वयंसेवी संस्थेने जनहित याचिकाद्वारे पुढे आणला होता.
यापूर्वी न्यायालयाने याबाबत आदेश देताना महिलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याबाबत सर्व पालिसांना अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याचे आदेश दिले होते. मात्र बहुतांशी पालिकांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्याबाबत न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रेवती ढेरे यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त करत स्वच्छतागृहे आणि त्याच्या देखभालीबाबत सर्वसमावेशक योजना आखण्याचे, त्यासाठी समिती स्थापन करण्यासह ३३ कलमी नियमावलीच पालिकांना आखून दिली. तसेच त्याच्या अंमलबजावणीचा अहवाल ८ मार्चपर्यंत म्हणजेच महिलादिनी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

अशी आहे न्यायालयाची नियमावली
* पालिकांनी त्यासाठी सर्वसमावेशक योजना आखावी.
* सर्व पालिकांचे आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली येत्या चार आठवडय़ात एक समिती नेमावी.
* समितीत महिला नगरसेवकांचा समावेश असावा.
* समितीने स्वच्छतागृहांसाठी जागा शोधावी. ही स्वच्छतागृहे कुठे, किती आणि कशाप्रकारे स्वच्छतागृहे बांधायची, त्याची देखभाल, तेथील वीजपुरवठा कसा अखंडित राहील याबाबत याबाबत समितीने योजना आखावी.
* स्वच्छतागृहांबाहेर महिला सुरक्षारक्षक ठेवण्यात यावेत. स्वच्छतागृहांच्या बाहेर सीसीटीव्ही बसवण्यात यावे. आपत्कालिन परिस्थितीसाठी इशारा घंटा उपलब्ध करणे. चांगल्या सुविधा उपलब्ध करताना शुल्क आकारण्याची मुभा असेल. परंतु महिलांना तेथे साबण, सॅनिटरी नॅपकिन नष्ट करण्याची सुविधा, हॅण्ड ड्रायर उपलब्ध कराव्यात.
* खासगी-सार्वजनिक तसेच कॉर्पोरेट जगताच्या मदतीनेही ही स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत. ही स्वच्छतागृहे पर्यावरणाचा विचार करून बांधण्यात यावीत. ई-स्वच्छतागृहे परिसरानुसार उभारावीत. अमूक ठिकाणी स्वच्छतागृहे आहेत हे सांगणारे फलक लावावेत. जीपीएसद्वारे त्याबाबत माहिती उपलब्ध करण्यात यावीत. महिला नगरसेवकाने या स्वच्छतागृहांच्या स्थितीची पाहणी करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 12:31 am

Web Title: comprehensive plan for womens toilets
Next Stories
1 हेमाला चिंतननेच कांदिवलीला बोलावले?
2 सभापतींविरोधात सरकारची राज्यपालांकडे तक्रार
3 धावत्या लोकलमध्ये अंध तरुणीचा विनयभंग
Just Now!
X