शहरातील मोजक्या ठाण्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर विशेष प्रणाली लवकरच

शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या कारभाराचा हिशोब ठेवण्यासाठी विशेष संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर प्रोग्राम) तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रणालीद्वारे पोलीस ठाण्यात आलेल्या व्यक्तींचे तपशील, त्यांच्या तक्रार वा कामाचे स्वरूप, त्यावर करण्यात आलेली कारवाई याची नोंद ठेवली जाईल.

पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या ही प्रणाली तयार करण्याचे काम सुरू आहे. ही प्रणाली अस्तित्वात आली की शहरातील मोजक्या पोलीस ठाण्यांमध्ये ती प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाईल. जर ही प्रणाली यशस्वी ठरली तर ती प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल.

विशिष्ट वर्गातील आणि मर्जीतील व्यक्तींना पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचे दरवाजे सताड उघडे असतात. अधिकारीही त्यांना जास्त वेळ देतात. त्यामुळे पोलीस ठाण्यामध्ये नळावरील भांडणांपासून गंभीर गुन्ह्य़ांची माहिती, तक्रार, अर्ज, विनंत्या घेऊन आलेल्या सामान्यांना तासन्तास ताटकळत थांबावे लागते. अनेकदा संबंधित अधिकारी नाहीत म्हणून सर्वसामान्यांना माघारी परतावे लागते. तक्रार अर्ज घेतल्यावरही तो बरेच दिवस पोलीस ठाण्यांमध्ये धूळ खात पडून असतो. त्यावर कारवाई होत नाही. गुन्हा नोंदवल्यानंतरही तपासाला सुरुवात होत नाही.

तक्रारींवर कारवाई न होणे, गुन्ह्य़ांचा वेगवान, पारदर्शक, अचूक तपास न होणे यामुळे जनतेत पोलिसांबाबतचा विश्वास कमी होतो. त्यांच्यातील दरी वाढते. न्यायालयात खासगी तक्रारी, याचिका केल्या जातात. मानवी हक्क आयोग, तक्रार निवारण प्राधिकरणांची पायरी गाठली जाते.

यामुळे पोलिसांची प्रतिमा जनमानसात मलिन होत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येकाला विश्वास निर्माण व्हावा, जास्तीत जास्त तक्रारी पुढे याव्यात, गुन्ह्य़ांची माहिती पोलिसांना मिळावी या उद्देशाने ही संगणीय प्रणाली तयार करण्यात येत असल्याचे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले.

कारणांचा छडा लागणार

पोलीस ठाण्यात आल्यानंतर व्यक्तीचे नाव आणि इतर तपशिलांसह येण्याचे कारण, तक्रारीचे स्वरूप, तक्रारीची दखल घेतली का, केलेली कारवाई, अन्य उद्देशाने आलेल्यांना पोलीस ठाण्यातील कोणत्या अधिकाऱ्याला भेटायचे आहे, भेट झाली का, अभ्यागत किती वाजता आला, गेला त्याची नोंद या प्रणालीत ठेवता येईल. या नोंदी ठेवणे सुरू झाल्यास पोलीस ठाण्यात आलेल्या किती तक्रारी, अर्ज विनाकारवाई पडून राहिले, का हे समजू शकेल. तसेच कारवाई काय केली, पुढील प्रगतीही समजू शकेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मध्यंतरी शिवडीतील अभिलेखावरील गुन्हेगार उत्तर प्रदेशातील शस्त्रांचे दुकान लुटून मुंबईत येत असताना नाशिक पोलिसांनी त्यांना अटक केली. या गुन्ह्य़ात आरोपींनी वापरलेली बोलेरो जीप ओशिवरा येथून चोरली होती. जीप चोरीनंतर मालक तक्रार देण्यासाठी अंबोली पोलीस ठाण्यात गेला. तेव्हा त्याला जीप वाहतूक पोलिसांनी उचलली का ते पाहून या, असे सांगण्यात आले. दोन दिवसांनी ते परत पोलीस ठाण्यात आले असता संबंधित अधिकारी रजेवर असल्याचे सांगण्यात आले.