उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात मासिक किंवा त्रमासिक पास संगणकीय आरक्षण पद्धतीने दिले जावे, अशी मागणी  ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’तर्फे (मनविसे) करण्यात आली आहे.
सवलतीच्या दरात पास मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांस त्याच्या शिक्षण संस्थेकडून शिफारस पत्र प्रत्येक वेळेस द्यावे लागते. हे शिफारस पत्र हस्तलिखित स्वरूपाचे असते. रेल्वे पाससाठी मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता असे पत्र देणे अयोग्य व कालबाह्य़ आहे.
रेल्वेने संगणकीय आरक्षण पद्धती अत्यंत परिणामकारक व तंत्रशुद्धपणे राबविली आहे. वेळोवेळी त्यात सुधारणाही करण्यात आल्या. विद्यार्थी सवलत पास योजनाही संगणकीय आरक्षण पद्धतीने राबविल्यास विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांकडून त्याचे स्वागतच होईल, असे स्पष्ट करत ‘मनविसे’चे उपविभाग अध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी पश्चिम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
संगणकीय आरक्षण पद्धतीमुळे वेळ आणि मनुष्यबळ वाचेल. शिवाय त्यात अचुकताही असेल. पेडणेकर यांच्या पत्राची दखल घेत या संबंधात आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे रेल्वने दिलेल्या लिखित उत्तरात स्पष्ट केले आहे.