नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आणि राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये यंदा राज्य निवडणूक आयोगाने यंदा काही बदल केले आहेत. थेट नगराध्यक्षपद निवडणुकीबरोबरच उमेदरवारांना ऑनलाईन किंवा संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. चार टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असल्या तरी नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या एकूण २१२ पैकी १६५ निवडणुका २७ नोव्हेंबरला पार पडत असल्याने ५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यात सरकारला तेवढी अडचण येणार नाही. नागपूर विभागातील निवडणुका या ८ जानेवारीला असल्याने कापूस आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारला मदत जाहीर करणे शक्य होणार नाही.

निवडणुकांचे वेळापत्रक

  • राज्यातील १९२ नगरपालिका आणि २० नगरपंचायती अशा एकूण २१२ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. नगगपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना तर थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
  • नगरपंयाचतींमध्ये मात्र एक सदस्यीय प्रभाग पद्धत असेल व निवडून आलेले सदस्य नगराध्यक्षांची निवड करतील. २७ नोव्हेंबरला १४७ नगरपालिका आणि १८ नगरपंयाचती अशा एकूण १६५ ठिकाणी निवडणुका होणार आहेत.
  • दुसऱ्या टप्प्यात १४ डिसेंबरला पुणे आणि लातूर जिल्ह्यातील १४ नगरपालिकांच्या निवडणुका होतील. १८ डिसेंबरला औरंगाबाद, नांदेड, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील २० नगरपालिका आणि दोन नगरपंचायती तर ८ जानेवारीला नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणुका होतील. प्रत्येक टप्प्यात मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मतमोजणी होईल.

एकूण जागा आणि मतदार किती ?

२१२ नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये एकूण ४७५० जागा आहेत. बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असल्याने प्रभागांची संख्या २४८५ असेल.  एकूण जागांपैकी २४४५ या जागा या महिलांसाठी राखीव असतील.

अनुसूचित जातींसाठी (६०८), अनुसूचित जमाती (१९८) तर इतर मागासवर्गीयांकरिता १३१५ जागा राखीव असतील. या राखीव जागांमध्ये ५० टक्के हे महिलांचे आरक्षण असेल. एकूण ७० लाख मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील.

जात प्रमाणपत्राचे काय ?

राखीव जागांमधून निवडणकू लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे अर्ज केल्याची पोच सादर करणे आवश्यक आहे.

थेट नगराध्यक्षाची निवड पहिल्यांदाच होत आहे का?

– यापूर्वी १९७४ आणि २००१-०२ मध्ये या पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. आता तिसऱ्यांदा थेट नगराध्यक्ष निवडले जातील.

चार टप्प्यांमध्ये एवढी लांबलचक प्रक्रिया कशाला?

डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत या नगरपालिकांची मुदत संपत आहे. डिसेंबरमध्ये मुदत संपत असलेल्या पालिकांच्या निवडणुका नोव्हेंबरअखेर होणार आहेत. जानेवारी किंवा फेब्रुवारीत मुदत संपणाऱ्या पालिकांच्या निवडणुका या डिसेंबर व जानेवारीत होतील. विधान परिषदेच्या सहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील निवडणुका याच कालावधीत होतील.

उमेदवारी अर्ज कसा भरावा लागणार?

  • उमेदवारी अर्ज भरताना आतापर्यंत समर्थकांसह वाजत-गाजत किंवा शक्तिप्रदर्शन करण्याची प्रथा आहे. पण नगरपालिका किंवा नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांना संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून अर्ज दाखल करावा लागेल.
  • निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. नामनिर्देशनपत्र व शपथपत्राची सारी माहिती संगणक प्रणालीवर भरावी लागेल.
  • ही माहिती भरल्यावर त्याची प्रिंट काढावी लागेल व स्वाक्षरी करून ती प्रिंट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत द्यावी लागेल.

मतदान असे करावे..

शक्यतो एकाच मतदान यंत्रणावर ही सारी प्रक्रिया करण्याचा प्रयत्न आहे. मतदान यंत्राच्या सर्वात वर गुलाबी रंगाची पाश्र्वभूमी असलेली बटणे असतील. त्यावर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची नावे असतील. मग नगराध्यक्षपदासाठी नोटाचा पर्याय असेल. याखाली दोन किंवा तीन प्रभागातील उमेदवारांची नावे असतील. द्विसदस्यीय प्रभाग पद्धती असली तरी काही ठिकाणी तीन सदस्यांचा प्रभाग आहे. गुलाबी रंग नगराध्यक्ष, निळा, पांढरा व हिरवा हे रंग सदस्यांसाठी मतदान यंत्रावर असतील. बहुसदस्यीय प्रभागांमुळे एका मतदाराला नगराध्यक्ष आणि दोन किंवा तीन नगरसेवकांकरिता मतदान करावे लागेल.