भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांना विधिमंडळात श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात यावा, अशी विनंती विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना, तर शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांना केली आहे.
 पानसरे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पानसरे हे विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसले तरी त्यांचे राजकीय, सामाजिक व वैचारिक क्षेत्रातील कार्य मोठे होते. विधिमंडळाचे सदस्य नसलेल्या अशा काही मान्यवरांना सभागृहात श्रद्धांजली वाहून त्यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त करण्यात आला होता. धीरुभाई अंबानी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, बाळासाहेब देवरस, मदर तेरेसा, कवी कुसुमाग्रज, सुधीर फडके, गोविंदभाई श्रॉफ, बाळासाहेब ठाकरे, नेल्सन मंडेला, पंडित भीमसेन जोशी आदी मान्यवरांना विधानमंडळात श्रद्धांजली वाहण्यात आल्याचे विखे-पाटील यांनी म्हटले आहे.  
पानसरे यांनी गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी यांच्यासाठी केलेले कार्य मोठे आहे. त्याशिवाय महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीत त्यांचे वैचारिक योगदानही महत्त्वाचे आहे. याचा विचार करून पानसरे यांना विधिमंडळात श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकप्रस्ताव मांडावा, अशी विनंती विखे-पाटील व जयंत पाटील यांनी केली आहे.