राज्यात करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला असून महानगरांप्रमाणेच ग्रामीण भागातही करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चिंता व्यक्त करीत परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्या वेळी लोक नियमांचे पालन करीत नसल्याने कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आल्याचे समजते. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे तसेच मराठवाडा आणि विदर्भातील जालना, बीड, भंडारा आणि गोंदिया जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्य़ांत करोनाचा उद्रेक होत आहे.

अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि वर्धा जिल्ह्य़ातील  परिस्थिती अधिक धोकादायक असून राज्यातील रुग्णदुपटीचा कालावधी ३१ जानेवारी रोजी ५६६ दिवसांपर्यंत गेला होता; पण तो आता २४७ दिवसांवर आल्याने सरकारची चिंता वाढली आहे.  त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्यात याव्यात  तसेच नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत अनेक मंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. मात्र टाळेबंदीबाबत घाईने निर्णय होऊ नये, अशीही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.