नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एम्स)च्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतील रुग्णांना स्वस्तात औषधे उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार पालिका रुग्णालयांच्या आवारांतील औषध विक्रेत्यांना स्वस्तात औषधे विकणे सक्तीचे करण्यात येणार आहे.
महापालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत औषधे उपलब्ध केली जातात. परंतु औषधांचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांना बाहेरील औषधांच्या दुकानांतून औषधे खरेदी करावी लागतात. याबाबत वारंवार नगरसेवकांकडून तक्रार करण्यात येत असून पालिका सभागृह आणि स्थायी समितीमध्ये प्रशासनावर ताशेरे ओढण्यात येतात. ही बाब लक्षात घेऊन दिल्लीतील एम्स रुग्णालयानुसार पालिका रुग्णालयांतील रुग्णांना स्वस्तात औषधे उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी घेतला आहे.
रुग्णांना जवळच औषधे मिळावीत, या उद्देशाने पालिका रुग्णालयाच्या आवारात औषधाचे दुकान चालविण्यासाठी जागा देण्यात येते. या जागेचे भाडे दुकानदारांकडून घेण्यात येतात. मात्र यापुढे दुकानदाराकडून भाडे घेण्यात येणार नाही. त्याऐवजी दुकानदाराला पालिका रुग्णालयातील रुग्णांना सवलतीच्या दरात औषधे द्यावी लागतील. तशी सक्तीच या दुकानदारांना करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.
वास्तु- विशेष