विविध आजारांनी पछाडलेले रुग्ण, विद्यार्थी, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, सैनिक, सैनिकांचे कुटुंबीय अशा समाजातील अनेक घटकांना रेल्वेकडून विविध सवलती दिल्या जातात. अनेकांना या सवलतींबद्दल खूपच कमी माहिती असते..

गेल्या आठवडय़ात रेल्वेच्या आरक्षित तिकिटाबाबत विविध गोष्टी जाणून घेतल्यानंतर काही दिवसांतच रेल्वेची तिकीट दरवाढ होण्याचे संकेत दिल्लीहून मिळायला लागले. आतापर्यंत वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीच्या तिकिटांमध्ये रेल्वेने हळूहळू वाढ केली आहे. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेच्या उपनगरीय तिकिटांच्या दरांतही वाढ होण्याची शक्यता आहे. रेल्वेचा हा तिकीट दरवाढीचा निर्णय कदाचित अनेकांना पटणारा नसेल, तर काही जण या दरवाढीचे समर्थनही करतील. रेल्वेसारख्या सरकारी यंत्रणेने नफा कमावू नये, असेही काहींचे मत असेल. पण या मतमतांतरामध्ये एका गोष्टीकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. किंबहुना ती गोष्ट अनेकांच्या गावीही नसते. ती म्हणजे रेल्वेचे सामाजिक उत्तरदायित्व आणि त्या उत्तरदायित्वापोटी रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या सवलती! रेल्वेतर्फे समाजातील तब्बल ४८ घटकांसाठी तिकीट आरक्षण तसेच उपनगरीय तिकिटांमध्ये सवलती दिल्या जातात. अनेकदा या सवलतींबाबत योग्य माहिती नसल्याने या सवलतींचा योग्य वापर प्रवाशांकडून होत नाही. त्यामुळे या सवलती कशा व कोणाला मिळतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

लहान मुले व विद्यार्थी

पाच वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना कोणत्याही कारणासाठी कोणत्याही श्रेणीतून प्रवास करताना १०० टक्के सवलत म्हणजेच मोफत प्रवास करता येतो. तर १२ वर्षांखालील मुलांना कोणत्याही श्रेणीतून प्रवास करताना प्रवास भाडय़ाच्या ५० टक्के सवलत असते. विद्यार्थ्यांसाठी रेल्वे अनेक सवलती देते. २५ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकण्याच्या ठिकाणापासून ते घर असलेल्या शहरापर्यंत किंवा परतीसाठी रेल्वेने द्वितीय श्रेणी वा शयनयान श्रेणीत ५० टक्के सवलत देऊ केली आहे. तर १२ वीपर्यंतचे विद्यार्थी आणि पदवीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी मासिक पास फुकटात देण्यात येतो. ही सवलत मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लागू आहे. हा पास विद्यार्थ्यांच्या घराच्या स्थानकापासून त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयाच्या स्थानकापर्यंतच दिला जातो. त्यासाठी संबंधित शैक्षणिक संस्थेकडून विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र रेल्वेला सादर करावे लागते. या विद्यार्थ्यांशिवाय परदेशातील विद्यार्थ्यांना काही शिबिरे, परिषद किंवा इतर महत्त्वाच्या कार्यशाळांना जायचे असेल, तर त्यांना ५० टक्के सवलत दिली जाते. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनाच्या कामासाठी प्रवास करायचा, तर त्यांना तिकिटाच्या रकमेच्या ५० टक्के रक्कमच भरावी लागते. त्यासाठी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडून प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवासी

६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले पुरुष आणि ५८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेतर्फे सवलती दिल्या जातात. ही सवलत राजधानी, शताब्दी अशा सर्वच गाडय़ांसाठी लागू असून कितीही अंतराच्या प्रवासासाठी त्यांना ही सवलत दिली जाते. पुरुष प्रवाशांना ४० टक्के आणि महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत रेल्वेतर्फे लागू केली आहे. त्यासाठी या नागरिकांना आरक्षण करताना एक अर्ज भरावा लागतो. तसेच प्रवासादरम्यान त्यांना त्यांचे वय नमूद केलेला सरकारी दाखला जवळ बाळगावा लागतो.

दिव्यांग प्रवाशांना प्रथम श्रेणी, थर्ड एसी, एसी चेअर या श्रेण्यांसाठी ७५ टक्के सवलत दिली जाते. तर वातानुकूलित प्रथम श्रेणी, सेकंड एसी या श्रेणींसाठी ५० टक्के; राजधानी व शताब्दी या गाडय़ांसाठी २५ टक्के रक्कम तिकिटातून वजा केली जाते. मानसिकदृष्टय़ा अपंग प्रवासी, अंध प्रवासी व त्यांच्यासह असलेला एक प्रवासी, यांनाही वरीलप्रमाणेच सवलती दिल्या जातात. संपूर्णपणे मुकबधिर प्रवाशांना प्रथम आणि द्वितीय श्रेणीबरोबरच शयनयान श्रेणीमध्ये ५० टक्के सवलत देण्याची सवलत आहे. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी सरकारी डॉक्टराकडून वैद्यकीय दाखला, विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दिलेले ओळखपत्र आदी गोष्ट आवश्यक आहेत.

खेळाडू, स्काऊट-गाइड इत्यादी इत्यादी..

स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांना शिबिरासाठी जाताना द्वितीय श्रेणी किंवा शयनयान श्रेणीच्या तिकिटांमध्ये ५० टक्के सूट दिली जाते. पण त्यासाठी स्काऊट-गाइडच्या जिल्हा किंवा राज्य केंद्राच्या आयुक्तांकडून मिळालेले प्रमाणपत्र दाखवावे लागते. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना शैक्षणिक सहलींसाठी प्रवास करताना द्वितीय तसेच शयनयान श्रेणीच्या तिकिटांवर २५ टक्के सवलत मिळते. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षकांना कोणत्याही कारणासाठी प्रवास करताना ५० टक्के सवलत मिळते. एखाद्या ठरावीक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी प्रवास करणाऱ्या हौशी कलाकारांकडे स्थानिक प्रशासनाचा दाखला आणि कार्यक्रम आयोजकांचे पत्र असल्यास या कलाकारांना द्वितीय व शयनयान श्रेणीच्या प्रवासासाठी ७५ टक्के सवलत आहे. हे कलाकार राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे विद्यार्थी असतील, तर त्यांना राजधानी, शताब्दीसह सर्व गाडय़ांसाठी ५० टक्के सवलत लागू होते. राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंकडे विद्यापीठाचे कुलसचिव, अखिल भारतीय क्रीडा संघटनेचे सचिव यांपैकी एकाचा दाखला असेल, तर त्यांना शयनयान श्रेणीत ७५ टक्के आणि प्रथम श्रेणीसाठी ५० टक्के सवलत लागू होते.

याशिवाय अनेक घटकांना रेल्वेच्या तिकिटांमध्ये सवलती आहेत. मात्र त्यासाठी रेल्वेचे नियमही तेवढेच कडक आहेत. कोणत्याही व्यक्तीला दोनपेक्षा जास्त घटकांसाठी सवलती घेता येत नाहीत. तशी परवानगी रेल्वे देत नाही. तसेच सर्व प्रकारच्या घटकांसाठी सवलतीचे अर्ज मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांच्या कार्यालयात उपलब्ध असतात. तसेच हे अर्ज भारतीय रेल्वेच्या http://www.indianrail.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.

रोहन टिल्लू 
@rohantillu