News Flash

मुंबई परिसरातील ४००० एचआयव्ही रुग्णांचे हाल

आरोग्य केंद्रात जाऊन आवश्यक औषधे घेण्यात अडथळे; लोकल प्रवासासाठी परवानगीची मागणी

(संग्रहित छायाचित्र)

संदीप आचार्य

टाळेबंदी वा निर्बंधांमध्ये जवळपास चार हजार एचआयव्ही रुग्णांना लोकल प्रवासासाठी परवानगी मिळत नसल्याने या रुग्णांना मुंबई आणि परिसरातील आरोग्य केंद्रात जाऊन अत्यावश्यक औषधे घेता येत नाहीत. या रुग्णांना रेल्वे लोकल प्रवासासाठी परवानगी मिळावी म्हणून ‘मुंबई एड्स नियंत्रण सोसायटी’ने रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले आहे.

मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीच्या अखत्यारीत मुंबई बाहेरील पालघर व ठाणे जिल्ह्यातील अनेक रुग्ण उपचार व औषधांसाठी येत असतात. एकट्या पालघर जिल्ह्यात चार हजार एचआयव्ही रुग्ण असून त्यातील अडीच हजार रुग्ण हे आमच्या आरोग्य केंद्रात औषधांसाठी येतात, असे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले. करोनाच्या पहिल्या लाटेत व देशात टाळेबंदी जारी झाली त्या वेळी सोसायटीने एचआयव्ही रुग्णांसाठी वसई, विरार, नालासोपारा, पालघर येथील आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी औषध देण्याची व्यवस्था केली. सध्या या रुग्णांना त्यांच्या कुठल्याही केंद्रावर जाण्यासाठी लोकलने प्रवास केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. जवळपास चार हजार रुग्णांना रेल्वेमधून प्रवास करण्याची परवानगी मिळालेली नसल्याने रेल्वेच्या तिकीट खिडकीवर त्यांना तिकीट दिले जात नाही. यासाठी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तिकीट खिडकीवर या रुग्णांनी त्यांच्याकडील ‘ग्रीन बुक’ ज्यावर त्यांचा फोटो असतो ते दाखविल्यास त्यांना तिकीट दिले जावे, अशी विनंती केली आहे. मात्र अद्याप रेल्वे प्रशासनाने या एचआयव्ही रुग्णांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी दिलेली नाही. परिणामी पालिका उपायुक्त व प्रकल्प संचालक विजय बालमवार यांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहून या रुग्णांची अडचण सांगितली तसेच रेल्वे प्रवासासाठी परवानगी मिळावी, अशी विनंती केली आहे.

३७ हजार रुग्णांची नोंद

*   संपूर्ण राज्यात दोन लाखांहून अधिक एचआयव्हीबाधित रुग्ण आहेत, तर मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत ‘मुंबई एड्स नियंत्रण सोसायटी’कडे ३७ हजार एचआयव्ही रुग्णांची नोंद आहे.

*   या रुग्णांना मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीच्या विविध केंद्रांतील डॉक्टरांच्या माध्यमातून एआरटी तसेच अन्य जीवनावश्यक औषधांचा पुरवठा केला जातो. साधारणपणे रुग्णाला एकावेळी महिन्याची व अपवादात्मक प्रसंगी दोन महिन्यांसाठी औषधे दिली जातात.

*   बहुतेक प्रकरणात एचआयव्ही रुग्ण हे आपली ओळख पटू नये यासाठी घराजवळील आरोग्य केंद्राची निवड न करता लांबच्या आरोग्य केंद्राची निवड करतात. याच ठिकाणी त्यांचे समुपदेशन, उपचार व औषध देण्याची व्यवस्था प्रामुख्याने केली जाते.

एचआयव्ही रुग्णांना वेळेत औषधे न मिळाल्यास त्यांची प्रकृती वेगाने ढासळू शकते. सध्याच्या करोना काळात त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणेही कठीण होणार आहे. त्यामुळे त्यांना औषधोपचारांसाठी रेल्वे प्रवासासाठी परवानगी मिळावी.

– विजय बालमवार, पालिका उपायुक्त व प्रकल्प संचालक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:38 am

Web Title: condition of 4000 hiv patients in mumbai area abn 97
Next Stories
1 महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीचा वेध
2 दहा जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रभाव अधिक 
3 Fact Check : मुंबई विमानतळाजवळ १ हजार बेडचं कोविड रुग्णालय? ‘त्या’ व्हायरल मेसेजमागचं सत्य!
Just Now!
X