जलदूत राजेंद्र सिंह यांचाही सहभाग

पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्यासाठी जसा मानवी हस्तक्षेप कारणीभूत ठरतो त्याचप्रमाणे मानवाची इच्छाशक्ती आणि प्रयत्न यामुळे निसर्गाची बिघडलेली घडी पुन्हा बसवता येते. राजस्थानच्या वाळूत पाण्याची समृद्धी आणण्यासाठी भगीरथ प्रयत्न करणारे ‘जलदूत’ राजेंद्र सिंह हे ‘लोकसत्ता’च्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या ‘आपण आणि पर्यावरण’ परिषदेत सहभागी होत आहेत. विविध पातळ्यांवर पर्यावरणसंवर्धनाचे काम करणारे अभ्यासक व कार्यकर्ते यांच्यासाठी प्रेरणास्थान असलेल्या राजेंद्र सिंह यांच्याकडूनच थेट त्यांच्या अनुभवाचे आणि पर्यावरणाच्या अभ्यासाचे बोल त्यांच्या खास शैलीत ऐकण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. ‘लोकसत्ता’ने टीजेएसबी सहकारी बँक लि.च्या सहकार्याने ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या या परिषदेला रिजन्सी ग्रुप आणि ‘केसरी’चीही मदत मिळाली आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थितीही या परिषदेला लाभणार आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या राजेंद्र सिंह यांच्या जलव्यवस्थापनाची महती ऐकण्यासाठी जगभरातील पर्यावरणतज्ज्ञ उत्सुक असतात. त्यांचे या विषयातील अफाट ज्ञान आणि त्याचसोबत ज्ञानसमृद्धीतून आकाराला आलेली पर्यावरणाची जाण ही पर्यावरणासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पर्वणीच ठरते.

पर्यावरणाच्या विविध पैलूंवर चर्चा

‘आपण आणि पर्यावरण’परिषदेत मान्यवरांचा सहभाग
‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत ‘लोकसत्ता’ने आतापर्यंत शिक्षण, नागरीकरण, उद्योग, शेती, सामाजिक संस्था या विषयांवर व्यापक चर्चा घडवून आणल्या आहेत. याच उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणजे आज (सोमवारी) आणि उद्या (मंगळवारी) होत असलेली पर्यावरण परिषद. या परिषदेत जंगलापासून शहरी पर्यावरणापर्यंत, पाण्यापासून कचऱ्यापर्यंत आणि पर्यावरण असंतुलनाच्या परिणामांपासून अर्थकारणाच्या प्रभावापर्यंत अनेक पैलूंवर चर्चा होणार आहे. ही चर्चा करण्यासाठी, समाज व पर्यावरण संतुलनात सेतूचे काम करणारे अभ्यासक आणि कार्यकर्ते ‘लोकसत्ता’च्या ‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमाअंतर्गत ‘आपण आणि पर्यावरण’ या परिषदेत सहभागी होत आहेत.
पाणी विषयातील नोबेल पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ‘स्टॉकहोम वॉटर प्राइज’ने गौरविले गेलेले जलदूत राजेंद्र सिंह या परिषदेच्या समारोपावेळी पर्यावरणासंबंधीचा त्यांचा दृष्टिकोन मांडणार आहेत. समाजाला पर्यावरणसंवर्धनात सहभागी करून घेतल्यास किती प्रचंड कार्य उभारता येते, त्याचे प्रत्यक्ष उदाहरण राजेंद्र सिंह यांनी राजस्थानमध्ये घालून दिले आहे. त्यांची उपस्थिती पर्यावरण क्षेत्रात काम करत असलेल्या कार्यकर्त्यांना आणि पर्यावरणप्रेमी सामान्यांना बळ देईल.
पर्यावरणाचा घटक असलेला मानवच त्याच्या असंतुलनाला कारणीभूत ठरतो आणि याच असंतुलनाचे परिणामही मानवाला भोगावे लागतात. पर्यावरणाच्या असंतुलनाची चर्चा यापूर्वीही अनेकदा झाली आहे. मात्र आता त्याच्या दोन पावले पुढे जात त्यावर उपाय करणे गरजेचे झाले आहे.
राज्यात विविध ठिकाणी असे उपाय राबवणाऱ्या कार्यकर्त्यांकडून आणि अभ्यासकांकडून परंपरागत समस्या ते नव्याने उद्भवू पाहणाऱ्या जटील प्रश्नांचे जाळे आणि त्यांना मुळापासून भिडणारी उत्तरे यांचा शोध या परिसंवादांमधून घेतला जाईल. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हेदेखील या परिषदेत उपस्थित राहणार असल्याने सामान्यांचे प्रश्न थेट राज्यकर्त्यांकडे पोहोचवण्यासाठीही ही परिषद व्यासपीठ ठरेल.

पाणी विषयातील नोबेल पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ‘स्टॉकहोम वॉटर प्राइज’ने नुकताच राजेंद्र सिंह यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यानंतर ते कार्यक्रमासाठी परदेशात गेले होते. तेथून परतल्यानंतर ते प्रथमच ‘लोकसत्ता’च्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांची उपस्थिती पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आणि पर्यावरणप्रेमींना बळ देईल.
आजची चर्चासत्रे

पहिले सत्र

जंगलांच्या कथा आणि व्यथा
सहभाग : सुधीर मुनगंटीवार, अर्थ व वनमंत्री
किशोर रिठे, संस्थापक, सातपुडा फाउंडेशन
विवेक कुळकर्णी, खारफुटी आणि शहरी जंगलांचे अभ्यासक

दुसरे सत्र

पाणी नेमके कुठे मुरतेय..
सहभाग : अविनाश कुबल, उपसंचालक, महाराष्ट्र निसर्ग उद्यान
सचिन वझलवार, जल अभ्यासक
डॉ. प्रसन्न पाटील, जल कार्यकर्ता

तिसरे सत्र

पर्यावरणीय असंतुलन आणि आपण
सहभाग : डॉ. विनया जंगले,
पशुवैद्यक अधिकारी
डॉ. कामाक्षी भाटे, सामाजिक वैद्यकशास्त्र तज्ज्ञ
अतुल देऊळगावकर, पर्यावरणतज्ज्ञ
उद्याची चर्चासत्रे

पहिले सत्र

शहर आणि पर्यावरण
सहभाग : महेश झगडे, आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
सुजित पटवर्धन, पर्यावरण कार्यकर्ते
विद्याधर वालावलकर, पर्यावरण दक्षता मंच
डॉ. अभय देशपांडे, प्रकाश प्रदूषणाचे अभ्यासक

दुसरे सत्र

कचरा : समस्या तशी महत्त्वाची
सहभाग : डॉ. शरद काळे, बी.ए.आर.सी. संशोधक,
कचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प
डॉ. श्याम आसोलेकर, आय.आय.टी. पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख
डॉ. अभय देशपांडे, खगोलमंडळ संस्थेचे समन्वयक

तिसरे सत्र

पर्यावरण आणि अर्थकारण
सहभाग : प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरणमंत्री
राजेंद्र सिंह, जलदूत
अतुल देऊळगावकर, पर्यावरणतज्ज्ञ
डॉ. विवेक भिडे, उद्योजक आणि पर्यावरण अभ्यासक