सर जे. जे. कला महाविद्यालयाच्या आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांनी शिक्षक वर्गात आल्याची खात्री पटल्यानंतरच सोमवारी आंदोलन मागे घेऊ, असे स्पष्ट केले आहे.
गेले आठवडाभर अपुरे शिक्षक आणि भौतिक सुविधांच्या अभावामुळे ‘जे. जे.’चे सर्व विद्यार्थी संस्थेच्या आवारात आंदोलन करीत आहेत. शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे दूरच, पण कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षकांच्या कंत्राटालाही सरकारने मुदतवाढ दिली नव्हती. त्यामुळे कित्येक विषय शिकविण्याकरिता या महाविद्यालयात शिक्षकच नाहीत.
शिवाय ज्या जिमखान्यात पूर्वी नाटकाची तालीम चालायची तो जिमखाना भंगाराचे सामान ठेवण्याचे गोदाम झाले आहे.
 मुलांच्या ‘कॉमन रूम’मध्ये पाणी साचते. तिथे वीज आणि पंखे नाहीत. मुलींच्या ‘कॉमन रूम’चे छप्पर इतके खराब झाले आहे की ते कधीही कोसळेल.
 जवळपास सर्वच छपाई यंत्रे नादुरुस्त आहेत. धातू कामासाठी आवश्यक असलेली एकही भट्टी सुरू नाही. तिथे मुलांना सिलेंडर व कोळसा मिळत नाही.
 त्यातून शिक्षकही नसल्याने विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट होऊन त्यांनी गेल्या सोमवारपासून आंदोलनाचा मार्ग पत्करला.
शिक्षक मिळविण्यासाठी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या या आंदोलनावरून राज्य सरकारला नामुष्कीला तोंड द्यावे लागले. अखेर ‘जे. जे.’मधील शिक्षकांच्या रिक्त जागा ३० एप्रिल, २०१५पर्यंत भरण्याचे सरकारने मान्य केले आहे. मात्र वर्गात शिक्षक आल्याची खात्री पटल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
 राज्यात ‘जे. जे.’सह सरकारची चार कला महाविद्यालये आहेत. या सर्व ठिकाणच्या मिळून तब्बल ४६ शिक्षकांच्या कंत्राटाला परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे ‘महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा’मार्फत (एमपीएससी) नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत हे शिक्षक वर्गावर शिकवतील.