मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेमधील संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना पालिकेने तिच्या घरातील कार्यालयात उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. हिमाचल प्रदेशातून बुधवारी ती मुंबईत दाखल होताच प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि राजकीय वर्तुळाने सारे विषय बाजूला सारत कंगनावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर घरावरील कारवाईवरून कंगनाने दिवसभर ट्विटरवरून थयथयाट केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी वापर करत तिने ‘फिल्म माफियांसोबत हातमिळवणी करत तुम्ही माझे घर तोडले असून तुमचेही गर्वहरण होईल, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. कंगनाने मुंबईतील परिस्थिती पाकिस्तानव्याप्त काश्मीरप्रमाणे असल्यासारखे म्हटल्याने टीका झाली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ  नको, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप केला होता. तसेच आपण ९ तारखेला मुंबईत येत असून हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आवाहन दिले होते. बुधवारी कंगना मुंबईत पोहोचली. महापालिकेचे कर्मचारी तिच्या घरातील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गेले असता कंगनाने ट्विटरवरून त्यांचा समाचार घेतला.

कंगनाच्या घरात १४ अनधिकृत बांधकामे केल्याचे पालिकेच्या नोटिशीत नमूद करण्यात आले होते. काही ठिकाणी अनधिकृतपणे खोल्या उभारण्यात आल्याचे नोटिशीत म्हटले होते. मात्र मुंबई महापालिकेने कालपर्यंत कोणतीही नोटीस पाठवली नाही. नूतनीकरणासंदर्भात सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असल्याचे तिने सांगितले.

दरम्यान, कंगना बाहेरगावी गेली असताना तिच्या घरात असलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाई केलीच कशी, अशी विचारणा करत पालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली, तर कंगनाच्या घरातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने केलेली कारवाई नियमानुसार आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले. संबंधित

कंगनाचे ट्वीट..

‘मणिकर्णिका फिल्म्स या माझ्या कार्यालयात अयोध्या या पहिल्या चित्रपटाची घोषणा झाली होती. ही माझ्यासाठी इमारत नसून राम मंदिर आहे. आज येथे बाबर आला असून इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पुन्हा पाडले जाईल, लक्षात ठेव बाबर, ते पुन्हा उभारण्यात येईल’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि करण जोहर गँग, तुम्ही माझे काम करण्याचे ठिकाण तोडले, आता माझे घर फोडा, मग माझा चेहरा आणि शरीरही; पण मी स्पष्टपणे सांगते, की मी जगो किंवा मरो याची पर्वा करीत नाही. मी व्यक्त होणारच.

 

ही माझ्यासाठी इमारत नाही तर राम मंदिर आहे. आज इथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पुन्हा पाडले जाईल, पण लक्षात ठेव बाबर, राम मंदिर पुन्हा उभे राहील.