मुंबई : दहावीची मूल्यमापन प्रणाली शासनाने जाहीर केली असली तरी बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत अद्यापही संभ्रम आहे. या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन वर्षभरातील स्वाध्याय, चाचण्या यांतील गुणांना ८० टक्के भारांश दिला असला तरी प्रत्यक्षात यंदा अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य मिळालेले नाही.

दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर पर्यायी मूल्यमापनाचे सूत्र शिक्षण विभागाने नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यानुसार नियमित शाळेच्या माध्यमातून अर्ज भरण्याऐवजी बाहेरून परीक्षा देणाऱ्या (१७ क्रमांकाचा अर्ज) विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. परीक्षेला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन ८० आणि २० अशा सूत्रानुसार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये दहावीच्या परीक्षेसाठी घेणे अपेक्षित असलेल्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेचे गुण २० ग्राह्य़ धरण्यात यावेत. तर लेखी परीक्षेसाठीच्या ८० गुणांचे मूल्यमापन वर्षभरातील स्वाध्याय, चाचण्या यांत मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात यावे असे विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही स्वाध्याय पुस्तिका किंवा संबंधित अभ्यास साहित्य मिळालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे साहित्य द्यायचे कधी आणि त्यांच्याकडून ते पूर्णकरून घ्यायचे कधी असा प्रश्न केंद्रावरील शिक्षकांना पडला आहे. नियमानुसार या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यापूर्वी नोंदणी करणे बंधनकारक असते. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रांनी मार्गदर्शन वर्गही घ्यायचे असतात. मात्र, यंदा नियमित विद्यार्थ्यांचे वर्गही नियमित झाले नाहीत. अशा वेळी बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देणेही शाळांना शक्य झाले नाही, असे एका मुख्याध्यापकांनी सांगितले.

मूल्यमापन कधी करायचे?

सध्या शाळा बंद आहेत, वाहतुकीवरही र्निबध आहेत. काही शाळांची प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे शाळांनी हे मूल्यमापन  महिन्याभराच्या कालावधीत कसे पूर्ण करायचे? असा प्रश्न मुख्याध्यापकांनी उपस्थित केला आहे.