सनदी लेखापाल (सीए) परीक्षा वादविवाद, न्यायालयीन प्रकरणांनंतर अखेर २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून मुंबईतील परीक्षार्थीना लोकल प्रवासाची मुभा मिळणार का याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. त्यामुळे परीक्षार्थी संभ्रमात आहेत.

इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) घेण्यात येणारी सनदी लेखापाल परीक्षा २१ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. मे महिन्यात होणारी परीक्षा करोनाच्या प्रादुर्भावामुळे जुलैमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, त्यावेळीही रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांनी केली. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले. त्यालाही पालकांनी विरोध केला होता.

आता परीक्षा पुढे ढकलणे शक्य नसल्याचे संस्थेने न्यायालयात स्पष्ट केल्यानंतर अखेर ही परीक्षा आता होणार आहे. मात्र, परीक्षार्थीसमोरील गोंधळ अद्यापही संपलेला नाही. अनेक भागात अद्यापही वाहतूकीची पुरेशी व्यवस्था नाही. त्याचबरोबर मुंबई आणि उपनगरातील परीक्षांर्थीना लोकल प्रवासाची परवानगी आहे का याबाबतही स्पष्टता नाही. त्यामुळे परीक्षार्थीमधील संभ्रम वाढला आहे. लोकल प्रवासाची परवानगी देण्याची मागणी परीक्षार्थीनी केली आहे.