राज्यातील ५३ टोल नाक्यांवर छोटय़ा वाहनांना टोलमधून सवलत दिल्यानंतर आता मुंबईतील पाच नाके आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलचा निर्णय ३१ तारखेपर्यंत सरकारला घ्यायचा आहे. मुंबईतून ये-जा करणाऱ्या छोटय़ा वाहनांना सवलत देण्याबाबत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनुकूल असले तरी कायदेशीर अडचणी तसेच पडणारा आर्थिक भार लक्षात घेता कोणता निर्णय घ्यायचा याबाबत सरकारच्या पातळीवर अद्यापि संदिग्धता कायम आहे. सचिव समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावरच विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सरकारी गोटातून सांगण्यात आले.

मुंबईतील पाच टोल नाक्यांवर ये-जा करताना छोटय़ा वाहनांना टोलमधून सवलत देण्याची सरकारची योजना आहे. या संदर्भात अतिरिक्त मुख्य सचिव (बांधकाम) आनंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती करण्यात आली होती. तशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. समितीला ३१ तारखेपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

सध्या समितीच्या वतीने सर्व पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. समितीचा अहवाल या आठवडय़ात सरकारला सादर केला जाईल. त्यानंतर सर्व बाबींचा विचार करून मुंबईतील पाच टोल नाके आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर छोटय़ा वाहनांना टोलमधून सवलत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. दोन्ही ठिकाणी टोल वसुली करणाऱ्या ठेकेदाराने छोटय़ा वाहनांना सूट देण्यास विरोधी भूमिका घेतली असून, तसा निर्णय झाल्यास ठेकेदाराकडून भरपाईची भरमसाट रक्कम मागितली जाईल, असे सांगण्यात येते.