आठ फूट उंचीचा आग्रह; पुन्हा सरकारी निर्देशांची प्रतीक्षा

मुंबई : गणेशोत्सवानंतर आता काही दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्तीच्या उंचीवरून मूर्तिकार संभ्रमात आहेत. गणेशोत्सवात ऐनवेळी जाहीर केलेल्या चार फू ट उंचीबाबतच्या निर्णयाने मूर्तिकारांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे नवरात्रोत्सवात तरी मूर्तिकारांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटावा यासाठी आठ फुटांपर्यंत मूर्ती घडवण्याचा निर्णय मुंबईतील बहुतांशी मूर्तिकारांनी घेतला आहे. परंतु सरकारी निर्देश न आल्याने अनिश्चिततेची टांगती तलवार कायम आहे.

यंदा अधिक मासामुळे जवळपास महिनाभराचा वेळ मूर्तिकारांना मिळाला आहे. हातात वेळ असला तरी सरकारी निर्देशांच्या प्रतीक्षेमुळे हात बांधले गेल्याची भावना मूर्तिकारांमध्ये आहे. ‘मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांकडे सरकारचे कायम दुर्लक्ष होते. गणेशोत्सवात मूर्तिकारांचे प्रचंड नुकसान झाले. कमी उंचीचे नवीन साचे बनवणे कमी वेळात शक्य नाही. शिवाय खर्चही अधिक आहे. त्यात सरकारी नियम जाहीर झाले नसल्याने मंडळही फिरकत नाही. त्यामुळे किमान आता तरी सरकारने आम्हाला समजून घेऊन आठ फुटापर्यंत परवानगी द्यावी,’ अशी विनंती मूर्तिकार सतीश वळीवडेकर यांनी केली. काही मूर्तिकारांनी मात्र वेळ न दवडता चार फुटापर्यंत मातीच्या मूर्ती घडवायला सुरुवात केली आहे. अर्थात काम सुरू झाले तरी मंडळांकडून प्रतिसाद नसल्याने अनिश्चितताच आहे.

मूर्तिकारांमध्ये एकवाक्यता असावी यासाठी श्री गणेश मूर्तिकला समितीने शनिवारी मूर्तिकारांची बैठक घेतली. पुरेसे अर्थार्जन करण्याच्या उद्देशाने आठ फुटांपर्यंत देवीची मूर्ती घडवण्याचा निर्णय एकमताने या बैठकीत घेण्यात आला. ‘गणेशोत्सवात ना कच्चा माल वेळेवर मिळाला, ना उंचीबाबत वेळेत निर्णय झाला. शिवाय माती आणि पीओपी हाही पेच मूर्तिकारांपुढे असल्याने झालेले नुकसान न भरून येण्यासारखे आहे. म्हणून मूर्तिकारांनीच आठ फुटांपर्यंत मूर्ती घडवण्याचा निर्णय घेतला. हा हंगाम गेला तर मूर्तिकारांची उपासमार होईल,’ असे समितीचे अध्यक्ष वसंत राजे यांनी सांगितले.

दरवर्षी नवरात्रोत्सवात आमची मूर्ती सहा फूट उंचीची असते. ती घडवण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागतो. सरकारने अद्याप निर्णय जाहीर न केल्याने सगळीच कामे अडकून पडली आहेत. शिवाय अष्टमीचा गरबा, गोंधळ आणि इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्याबाबतही सरकारकडून योग्य मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे.

– स्वप्निल परब, सचिव, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली.