मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्षांच्या सत्र परीक्षांवरून संभ्रम निर्माण झाला आहे. काही महाविद्यालयांनी सत्र सुरू झाल्यानंतर आवश्यक कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच परीक्षांचे नियोजन केले असून, प्राध्यापक संघटनेने त्यावर आक्षेप घेतला आहे. जानेवारीअखेरीस परीक्षा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

गेल्या शैक्षणिक वर्षांतील अंतिम वर्षांच्या परीक्षांचा गोंधळ उरकल्यानंतर विद्यापीठाने या सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. या परीक्षा महाविद्यालयांकडे सोपवण्यात आल्या आहेत. महाविद्यालय समूह या परीक्षांचे नियोजन करणार आहे. प्रत्येक समूहाने आपापल्या सोयीनुसार परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. काही महाविद्यालयांनी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे, तर काही महाविद्यालयांच्या परीक्षा जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात घेण्याचे जाहीर केले आहे.

कोकणातील काही महाविद्यालयांनी परीक्षा डिसेंबरमध्येच घेण्याचे ठरवले आहे. परीक्षांबाबत संभ्रम दूर करण्याची मागणी प्राध्यापक संघटनेने केली आहे. याबाबत बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनने मुंबई विद्यापीठाला निवेदन दिले आहे.

अध्यापन कालावधीही अपुरा : प्रवेश झाले तरी महाविद्यालयांचे अध्यापन कधी सुरू करण्यात यावे, याबाबत विद्यापीठाने स्पष्ट सूचना दिल्या नव्हत्या. अनेक महाविद्यालयांमध्ये अगदी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येही प्रवेश सुरू होते. विद्यापीठाने यंदा शैक्षणिक वेळापत्रकच जाहीर केले नाही. अध्यापनासाठी ९० दिवसांचा कालावधी मिळणे नियमाप्रमाणे आवश्यक आहे. मात्र त्यापूर्वीच प्रथम वर्षांच्या परीक्षा होत असल्याचा आक्षेप संघटनेने घेतला आहे. परीक्षा आणि शैक्षणिक वर्षांबाबत विद्यापीठाचे बेफिकिरीचे धोरण असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.