अमित शहांच्या कार्यक्रमाचे ढिसाळ नियोजन : प्रचंड गर्दी, धक्काबुक्की अन् गोंधळ

भाजप अध्यक्ष अमित शहा यांची ‘विविध क्षेत्रांतील मान्यवरां’सोबत (ओपिनियन मेकर्स मीट) आयोजित करण्यात आलेली बैठक ढिसाळ नियोजनामुळे केवळ फार्स ठरली.  ती भाजपची निवडणूक प्रचारसभाच ठरली. प्रचंड गर्दी, धक्काबुक्की व गोंधळाच्या वातावरणात काहींनी शहा यांना केवळ लेखी निवेदने दिली. सूचनांसाठी पेटी ठेवण्यात आली होती. गुजराती, मारवाडी भाषिक व्यापारी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अन्य कर्मचारी आदी घुसल्याने हॉलमध्ये प्रचंड गर्दी झाली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद व चर्चा होण्याऐवजी शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सरकारच्या कामांची जंत्री व भाजपची महती सांगून निवडणूक प्रचारसभाच घेतली.

शहा हे तीन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. त्यानिमित्ताने समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधून चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन विलेपार्ले येथील बीजे हॉलमध्ये करण्यात आले होते. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर निमंत्रणे वाटली गेली होती.

प्रवेशद्वारावर निमंत्रणे तपासण्यासाठीची व्यवस्था प्रचंड गर्दीमुळे कोलमडली. सर्व आसने भरल्याने अनेक लोक उभे होते. वादग्रस्त पाश्र्वभूमी असलेले हिरे व्यापारी भरत शहा यांच्यासह अनेक गुजराती, मारवाडी व्यापारी, शेअर मार्केटमधील दलाल, कार्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती यांच्याबरोबर भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मंत्र्यांचे कर्मचारी व अन्य मंडळी मोठय़ा प्रमाणावर होती. हॉलची क्षमता लक्षात न घेता निमंत्रणे भरमसाट वाटली गेल्याने गर्दी होऊन रेटारेटी झाली. त्यामुळे शेजारील हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली.

प्रसिद्धीमाध्यमांसाठी बसण्यासाठी राखीव जागाच नसल्याने कॅमेरांसाठी असलेल्या स्टेजजवळ सर्वाची गर्दी झाली. पत्रकारांसह कॅमेरामन उभे असल्याने शहा यांच्या भाषणाच्या वेळी श्रोत्यांनी आरडाओरड केली. तेव्हा सर्वानी बसल्याशिवाय मी बोलणार नाही, असे शहा यांना सांगण्याची वेळ आली.

शिस्तबद्ध पक्ष असल्याचे सांगणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यक्रमातच ढिसाळ व्यवस्थापन असल्याचे चित्र होते. मुंबई अध्यक्ष आशीष शेलार हे शहा, मुख्यमंत्र्यांच्याच स्वागतामध्ये मग्न होते व पदाधिकाऱ्यांचे नियंत्रण राहिले नाही. परिणामी, शेकडो निमंत्रितांना उभे राहावे लागले व पिण्याचे पाणीही मिळू शकले नाही. त्यामुळे अनेकांनी संपात व्यक्त केला.

काँग्रेसवर टीकास्त्र

शहा यांचा हा कार्यक्रम अराजकीय प्रकारचा असेल, असे सांगितले जात होते. त्यामुळे शहा यांचे आगमन झाल्यावर घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर जाण्याची सूचना मुंबई अध्यक्ष शेलार यांनी केली होती. मात्र शहा यांनी राजकीय इतिहासातील दाखले देत काँग्रेसवर घराणेशाहीची टीका केली. पक्षांतर्गत लोकशाही, सिद्धांत आणि कार्यक्षमता दाखविणारा पक्षच उत्तम वाटचाल करू शकतो, असे सांगून भाजपच्या केंद्रातील व राज्यातील सरकारची कामगिरी सांगून गुणगान केले.

  • अमित शहा यांच्याशी संवाद होईल, असे सांगून विविध क्षेत्रांतील शेकडो जणांना आमंत्रित करण्यात आले होते.
  • डबेवाल्यांची संघटना, एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांच्यापासून अनेकांचा त्यात समावेश होता.
  • भाजप नेत्यांनी त्यांच्याकडून केवळ लेखी निवेदने स्वीकारली आणि शहा यांनी कार्यक्रम संपल्यावर गर्दीत, रेटारेटीत आठ-दहा जणांची निवेदने घेतली. त्यामुळे संवादाचा फार्सच ठरला व निमंत्रितांना काहीच बोलता आले नाही.