मुंबई विद्यापीठाच्या आदेशामुळे अनेक महाविद्यालये चक्रावली; वेळापत्रक कोलमडणार
‘तृतीय वर्ष विज्ञान शाखे’च्या पाचव्या सत्र परीक्षेच्या तोंडावरच ‘अप्लाईड कंपोनन्ट’ या विषयाची लेखी परीक्षा प्रात्यक्षिकांच्या बरोबरीने महाविद्यालय स्तरावरच घेण्याचे फर्मान मुंबई विद्यापीठाने सोडल्याने महाविद्यालये चक्रावून गेली आहेत. कारण बी.एस्सी.च्या पाचव्या सत्राची परीक्षा ६ ऑक्टोबरपासून सुरू होते आहे. त्यात ‘अप्लाईड कंपोनन्ट’ची प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षेचे आयोजन करणे, उत्तरपत्रिका तपासून निकाल लावणे अशा आयत्यावेळी येऊन पडलेल्या कामाचा बोजाही महाविद्यालयांना पेलावा लागणार असल्याने प्राचार्याचे धाबे दणाणले आहेत.
मुळात विज्ञान शाखेच्या २६ विषयांपैकी केवळ या एकाच विषयाची परीक्षा आपण का घ्यायची, असा मूलभूत प्रश्न महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना सतावतो आहे. कारण तृतीय वर्षांत अंतर्भूत असलेल्या पाचव्या आणि सहाव्या सत्राची लेखीच नव्हे, तर प्रात्यक्षिक परीक्षाही विद्यापीठ स्तरावर घेतली जाते. परंतु ‘अप्लाईड कंपोनन्ट’च्या दोन्ही सत्राच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर घेण्याचे फर्मान विद्यापीठाने २१ सप्टेंबरला परिपत्रक काढून सोडल्याने गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागानेही नेहमीप्रमाणे आपल्या वेळापत्रकात अप्लाईड कपोनन्टचाही समावेश केला होता. या परीक्षेची प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी महाविद्यालयात पाठविली असताना हे परिपत्रक येऊन धडकल्याने मोठाच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे आता महाविद्यालयांना या विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून अनेक कामांचे नियोजन करावे लागणार आहे.

गोंधळाचीच शक्यता..
विद्यापीठाने हा आदेश देण्याआधी महाविद्यालयांना स्वत:चा अभ्यासक्रम ठरविण्याची संधी देणे अपेक्षित होते. ही संधी न देताच थेट परीक्षा घेण्याबाबत फर्मावून विद्यापीठाने या प्रयोगातील आत्माच काढून घेतला आहे. त्यामुळे अपेक्षित हेतू सफल तर होणार नाहीच, उलट त्यामुळे गोंधळच उडण्याची अधिक शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया माजी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी व्यक्त केली.