29 January 2020

News Flash

अकरावी प्रवेशाचा गोंधळ

प्रथम पसंती महाविद्यालयात विषय नसल्याने प्रवेश नाकारला

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

प्रथम पसंती महाविद्यालयात विषय नसल्याने प्रवेश नाकारला

दहावीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेले बहुतांश विद्यार्थी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत प्रथम पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेशास पात्र ठरले. या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेले. त्यावेळेस महाविद्यालय प्रशासनाने सामान्य गणित असल्यामुळे तुमच्यासाठी गणिताला पर्यायी असलेला विषय आमच्या महाविद्यालयात शिकविला जात नाही, तुम्हाला प्रवेश देता येणार नाही असे सांगितले. यामुळे सामान्य गणित घेऊन उत्तीर्ण झालेल्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या शेकडो विद्यार्थ्यांसमोर आता प्रवेशाचा प्रश्न उभा राहिला आहे.

पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही तर ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडणार तर दुसरीकडे महाविद्यालयात विषय नसल्यामुळे प्रवेश मिळत नाही. यामुळे नेमके करायचे काय असा गोंधळ या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. सामान्य गणित हा विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेत गणिताला एसपी हा विषय पर्यायी असतो. तर कला शाखेत इतर भाषा किंवा अन्य त्यांच्या आवडीचा विषय पर्यायी असतो. मात्र वाणिज्य शाखेत पहिल्या यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना ते पात्र ठरलेल्या महाविद्यालयात एसपी हा विषय शिकविला जात नसल्यामुळे प्रवेश मिळू शकलेला नाही. हा प्रश्न ४०० ते ५०० विद्यार्थ्यांचा असून यामध्ये आणखी काही विद्यार्थ्यांची भर पडू शकते असे सूत्रांकडून समजते. या विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज तपासत असताना ऑनलाइन प्रणालीमध्येच त्यांनी चुकीचे महाविद्यालय निवडले असेल तर त्याच्या दुरुस्तीची सोय असणे अपेक्षित आहे. मात्र आपल्याकडील प्रणालीत तशी सोय उपलब्ध नसल्याचे मनविसेचे उपाध्यक्ष व माजी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी सांगितले. ही केवळ विद्यार्थ्यांची नव्हे तर प्रशासनाचीही चूक असल्याचे ते म्हणाले. तर कोणत्या महाविद्यालयांमध्ये कोणते विषय शिकविले जातात. याचा तपशील प्रवेश पुस्तिकेमध्ये असतो. विद्यार्थ्यांनी पुस्तिका वाचून अर्ज भरणे अपेक्षित असल्याचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी सांगितले. तर पहिल्या पसंती क्रमाचे महाविद्यालय आल्यामुळे तसे विद्यार्थी आता प्रवेश प्रक्रियेतून बाद होतील मात्र या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे प्रवेशाच्या सर्व फेऱ्या झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येईल असेही चव्हाण यांनी नमूद केले.

मदत केंद्र वाढविण्याची मागणी

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला आहे. हा गोंधळ लक्षात घेता शहरातील मदत केंद्रांची संख्या वाढवावी अशी मागणी मनविसेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी बैठक बोलविण्यात आली असून केंद्रे वाढविण्याबाबत सकारात्मक असल्याचे चव्हाण यांनी सांगितल्याचे तांबोळी म्हणाले.

प्रवेशासाठी एक दिवस वाढवावा

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ लक्षात घेता, पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्यासाठी गुरुवापर्यंतची मुदत एक दिवसाने वाढवावी कारण पहिली गुणवत्ता यादी मंगळवारी संध्याकाळी पाच ऐवजी मध्यरात्री दीड वाजता जाहिर झाली त्यात विद्यार्थी व महाविद्यालयांमध्ये गोंधळ झाल्याने मुदतवाढ द्यावी जेणेकरून विध्यार्थ्यांना दिलासा मिळेल, अशी मागणी मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी केली आहे.

 

First Published on July 13, 2017 2:38 am

Web Title: confusion in fyjc admission 2017
Next Stories
1 माझगावच्या शाळेतून ‘मायक्रोसॉफ्ट’ हद्दपार
2 दादरमध्ये कोंडीचा एकेरी मार्ग
3 सारासार : त्यांचा जीवच जातो!
Just Now!
X