करोनाबाधित होण्याच्या भीतीने जवळपास गेले वर्षभर घरात कोंडून राहिलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी सोमवारी सकाळपासूनच करोनाची लस घेण्यासाठी शहरातील केंद्रांवर गर्दी केली होती. परंतु ‘कोविन अ‍ॅप’मधील त्रुटींमुळे ज्येष्ठ नागरिकांसह अत्यावश्यक आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना रांगांमध्ये ताटकळत बसावे लागल्याने सर्व केंद्रावर एकच गोंधळ उडाला होता.

मुंबईत मुलुंड, दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीके सी) करोना केंद्र, गोरेगावचे नेस्को करोना केंद्र आणि सेव्हन हिल्स रुग्णालय येथे सोमवारी तिसऱ्या टप्प्याअंतर्गत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. याची वेळ सकाळी १२ ते संध्याकाळी पाच असली तरी काहींना वेळेबाबतची माहितीच न पोहचल्याने, तर काहींना चुकीची माहिती मिळाल्याने सकाळी साडेआठ वाजल्यापासूनच ज्येष्ठ नागरिकांनी रांगा लागल्या होत्या. नोंदणी करता न आल्याने किंवा नोंदणी करणे गैरसोयीचे असल्याने लसीकरणासाठी बहुतांश ज्येष्ठ नागरिक थेट केंद्रावरच नोंदणी करण्यासाठी आले होते. त्यात दुपारी १२ वाजता सुरू झालेले अ‍ॅप काही क्षणातच बंद झाल्याने लसीकरणाच्या पहिल्या दिवसाप्रमाणेच सोमवारी गोंधळ उडाल्याचे दिसत होते.

मुलुंडच्या करोना केंद्रामध्ये दुपापर्यंत लसीकरणासाठी प्रचंड गर्दी झाली होती. अखेर आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले ४५ वर्षांवरील नागरिक अशा दोन भागांमध्ये गर्दीचे विभाजन करण्याची वेळ आली. त्यात अ‍ॅप दुपापर्यंत सातत्याने बंद पडत असल्याने रांगा वाढतच जात होत्या. सकाळपासून रांगांमध्ये अवघडून बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा संयम सुटला आणि संतप्त झालेल्या नागरिकांना आवरताना केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या नाकीनाऊ आले होते. अखेर दुपारी मुख्य दारावरूनच लसीकरणासाठी आलेल्यांना परत पाठविण्याची वेळ केंद्रावर आली.  अ‍ॅपच उशिरा सुरू झाले. त्यात अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने वेळ लागत आहे. लोकांना वेळोवेळी सूचना देत आहोत. परंतु ज्येष्ठ नागरिकही बराच काळ बसले असल्याने त्यांची चीडचीड होणे स्वाभाविक आहे. ज्या नागरिकांना बसणेही शक्य नाही अशांसाठी खाटाची सुविधा केल्याची माहिती मुलुंड करोना केंद्राचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप आंग्रे यांनी दिली. अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या मुख्य दारापाशीच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना अडवले होते. बराच काळ आत न सोडल्याने अनेकांनी वाट पाहून घरची वाट धरली. परंतु वयोमानाने सतत घराबाहेर पडणे शक्य नाही किंवा शारीरिक व्याधी असणारे ज्येष्ठ मात्र बराच काळ लसीकरणाची वाट पाहत थांबले होते. तांत्रिक अडचणींमुळे अखेर रुग्णालयाच्या सुरक्षा लाभार्थ्यांना घरी जाण्याची सूचना करण्यात आली. त्यावेळी संतप्त ज्येष्ठ नागरिकांनी गोंधळ सुरू केला. ज्येष्ठांना बसण्यासाठी खुर्ची, पिण्याचे पाणी अशी कोणतीच सोय नसल्याने अनेकांना पदपथावर बसावे लागले. दहिसरच्या आरोग्य केंद्रावरील नोंदणी बंद करून जवळपास १०० जणांना परत पाठविण्यात आले. नेस्को केंद्रावर एका ठिकाणी टोकन देण्यात येत होते, तर दुसऱ्या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी केली जात होती. दोन वेळा रांग लावावी लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

कर्मचाऱ्यांचा खोळंबा

आरोग्य, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक यांची एकाच वेळी झालेली गर्दी आणि सातत्याने बंद पडणारे अ‍ॅप यांमुळे वांद्रे-कु र्ला संकु लातील करोना केंद्रात रुग्णालयातील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. ‘लस घेऊन कामावर जायचे आहे. म्हणून सकाळी ९ वाजताच येऊन बसलो आहोत. तीन तास झाले तरी टोकनही मिळालेले नाही’ अशी नाराजी बेस्ट कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. तर ‘कार्यालयातील कामे आवरून घाईने लस घेण्यासाठी आलो. दोन तास उलटले तरी इथेच बसलो आहोत. परंतु ज्येष्ठ नागरिकांनाच आत सोडले जात आहे, असे मत आरोग्य कर्मचाऱ्यांनी व्यक्त के ले.

नोंदणी केलेल्यांचेच लसीकरण करण्याची भूमिका

पालिकेच्या रुग्णालयांसह चार खासगी रुग्णालयांमध्येही सोमवारी लसीकरण सुरू झाले. येथेही अनेकांनी नोंदणी न करताच सकाळी आठपासूनच हजेरी लावल्याने रुग्णालयांना गर्दी आवरणे अवघड झाले. ‘नोंदणी करण्यासाठी वेळ दाखवत नसल्याने अनेक जण थेट रुग्णालयात आले होते. त्यात अ‍ॅप नीट सुरू नसल्याने नोंदणी करण्यात अनेक अडचणी येत होत्या. मंगळवारपासून नोंदणी केलेल्यांचे लसीकरण करण्यात येईल, असे महालक्ष्मी येथील एसआरसीसी रुग्णालयाच्या संचालक डॉ. सोनू उडाणी यांनी स्पष्ट केले.

करोनासंदर्भातील नियमांचा फज्जा

लसीकरण वेळेत सुरू न झाल्यामुळे अनेक केंद्रावर गर्दी झाली आणि अंतर नियमांचा फज्जा उडाला. अंतर नियम ठेवण्यासाठी सातत्याने केंद्रावरून आवाहन केले जात होते. परंतु वाढती गर्दी आणि नागरिकांचा सुटलेला संयम यामुळे दुपारनंतर प्राधान्याने लस घेण्यासाठीचा अट्टहास सुरू झाल्याने सुरक्षित अंतर नियमांचा अनेकांना विसर पडला.

मी सकाळी ९ पासून रुग्णालयाच्या दारावर बसून आहे. नोंदणीही झाली. परंतु सुरक्षारक्षक आत जाऊ देत नाही. तांत्रिक अडचणीचे कारण देऊन गेले चार तास बसवून ठेवण्यात आले. वयस्कर माणसांना शरीराची दुखणी असतात. असे रस्त्यात किती उशीर बसायचे.

– भरत काचेरिया (वय ६७)

मी आणि माझे ८६ वर्षीय वडील यांची नोंदणी आज सकाळी केली. लसीकरण केंद्रावर आल्यावर थोडा वेळ वाट पाहावी लागली. परंतु फेरतपासणी वेळेत पूर्ण झाल्याने लगेचच लस घेता आली. गेले वर्षभर दोघांनाही करोनाची बाधा होण्याची भीती होती. आता लस घेतल्यानंतर आत्मविश्वास आला आहे.

– हितेश दफ्तरी (वय ५७, सहव्याधी रुग्ण)

आम्हाला मोबाइलमधील फारसे समजत नाही. मुलांनी नोंदणी करून दिली म्हणून येथे येऊ शकलो. करोना काळात मी आणि माझी ७५ वर्षीय आई भीतीने फारसे घराबाहेर पडलोच नाही. बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. परंतु अखेर लस मिळाल्याचे समाधान आहे.

– गिरीधर राठी (वय ५९)