विद्यापीठाचे वार्षिक नियोजन अद्यापही जाहीर नाही

मुंबई : अंतिम वर्षांच्या परीक्षांचा प्रश्न अद्याप पुरता सुटलेला नसताना आता या शैक्षणिक वर्षांतील सत्र परीक्षांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यापीठाने अद्यापही शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्यामुळे ऑनलाइन वर्ग जुलैपासून सुरू झाले असले तरी नेमके सत्र कधी संपणार आणि परीक्षा कधी आणि कशा होणार याबाबत संभ्रम आहे.

मुंबई विद्यापीठाचे अनेक अभ्यासक्रम हे सत्र पद्धतीनुसार आहेत. म्हणजेच प्रत्येक सत्राला स्वतंत्र विषय अभ्यासण्यासाठी असतात आणि प्रत्येक सत्राची परीक्षाही होते. यंदा मात्र विद्यापीठात अद्यापही वार्षिक नियोजन जाहीर केलेले नाही. नुकत्याच गेल्या शैक्षणिक वर्षांतील अंतिम वर्षांच्या परीक्षा महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये संपल्या आहेत. आता या शैक्षणिक वर्षांतील पहिल्या सत्र परीक्षा कधी आणि कशा होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

गेल्या शैक्षणिक वर्षांच्या (२०१९-२०) परीक्षांबाबत करोना प्रादुर्भावामुळे गोंधळ झाला. प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांचे निकालाअंतर्गत मूल्यमापन आणि आदल्या वर्षीच्या गुणांच्या सरासरीनुसार जाहीर करण्यात आले. या निकालानुसार उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलून त्यांच्यासाठी जुलैपासून ऑनलाइन वर्गही महाविद्यालयांनी सुरू केले. दरवर्षीच्या नियोजित वेळापत्रकानुसार साधारण जून किंवा जुलैमध्ये पहिले सत्र सुरू होऊन ते नोव्हेंबपर्यंत संपते आणि त्यानंतर सत्र परीक्षा होते. मात्र दरवर्षीच्या नियोजनानुसार पहिले सत्र संपले तरी वार्षिक वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

परीक्षा हव्यातच

गेल्या शैक्षणिक वर्षांत अपवादात्मक परिस्थितीत सरासरी मूल्यमापनाचा पर्याय विद्यापीठाने स्वीकारला. त्यावेळी अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांना महत्त्व होते. या सत्रात अंतर्गत मूल्यमापनासाठी प्रकल्प, चाचण्या असे काहीच अद्याप सुरळीत झालेले नाही. महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिकेही झालेली नाहीत. त्याचप्रमाणे गेल्या वर्षीच्या गुणांचा आधार घ्यायचा झाल्यास तेदेखील सरासरीनुसार देण्यात आले आहेत, त्यामुळे पहिल्या सत्राच्या परीक्षा होणे आवश्यक आहे. त्याचे नियोजन विद्यापीठाने वेळेवर जाहीर केले पाहिजे, असे मत एका प्राध्यापकांनी व्यक्त केले.

शिकवणार काय?

साधारण जुलै-ऑगस्टपासून महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन तासिका सुरू आहेत. एका दिवशी एक किंवा दोन विषयांच्या तासिका होतात. ऑनलाइन शिकवण्यात अनेक अडचणी आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे काही वेळा तासिका एकतर्फी होतात. त्यामुळे वर्गात जेवढा भाग एका तासिकेत शिकवून होतो, त्यापेक्षा अधिक भाग ऑनलाइन तासिकेत काही वेळा शिकवून होतो. त्यामुळे सत्राचा कालावधी वाढला तर पुढील काळात विद्यार्थ्यांना काय शिकवायचे असाही प्रश्न पडणार आहे. सद्य:स्थितीत अनेक विद्यार्थी त्यांच्या गावी आहेत. मुंबई, ठाण्यातील विद्यार्थ्यांनीही बाहेर पडणे योग्य नाही, त्यामुळे त्यांना प्रकल्प करायला सांगण्याचे पर्यायही मर्यादित आहेत, असे मत एका प्राचार्यानी व्यक्त केले.