दिल्ली, गुजरात, गोवा, राजस्थान येथून महाराष्ट्रात रेल्वे, विमानमार्गे येणाऱ्या प्रवाशांच्या करोना तपासणीची व्यवस्था संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि विमानतळ व्यवस्थापनाद्वारे होणार असली तरी महामार्गावरून खासगी बस, वाहनांनी येणाऱ्या प्रवाशांची तपासणी कशी करणार याबाबत संभ्रम आहे.

दिल्ली, गोवा,राजस्थान आणि गुजरात येथून मोठय़ा प्रमाणात खासगी प्रवासी बस येतात आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जातात. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक बसमधील प्रवाशाची तपासणी करणे अशक्य असून त्या-त्या जिल्ह्य़ातील जिल्हाधिकारी व पालिकांना सक्षम यंत्रणा उभारताना गोंधळ उडू शकतो.

पश्चिम रेल्वेवरून मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस, दादर येथे ४० गाडय़ा राज्याबाहेरून येतात. मुंबईत चार राज्यातून दाखल होणाऱ्या प्रवाशांचा अहवाल पाहणी आणि तपासणीसाठी सहा मुख्य रेल्वे स्थानकांवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात येणार आहेत. स्थानकावर करण्यात येणाऱ्या चाचणीचे पैसे प्रवाशांकडून घेण्यात येणार असल्याने प्रवासी व पालिका कर्मचाऱ्यांमध्ये वाद उद्भवण्याची शक्यताही आहे.