सरकारच्या आदेशातील संभ्रमाचा दुचाकीस्वारांना फटका

मुंबई : टाळेबंदी शिथिलीकरणाच्या नव्या टप्प्यामध्ये दुचाकीवरून दोन जणांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, ही परवानगी १ ऑगस्टपासून की ५ ऑगस्टपासून याबाबत स्पष्टता नाही. याचा फटका दुचाकीस्वारांना बसू लागला असून सोमवारी ‘डबल सीट’ने निघालेल्या दुचाकीस्वारांना पोलिसांच्या कारवाईला तोंड द्यावे लागले.

टाळेबंदी शिथिल करताना किंवा निर्बंधांची पकड सैल करताना प्रत्येक वेळेस संभ्रमावस्था निर्माण झाली. कधी नागरिक, व्यावसायिकांच्या अतिउत्साहामुळे, तर कधी शासन आणि शासकीय यंत्रणांकडून स्पष्ट भूमिका, माहिती न दिली गेल्याने अशा गोंधळाचे वातावरण याआधीही निर्माण झाले होते. २९ जुलैला राज्य शासनाने आदेश जारी करून टाळेबंदीची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली. तसेच जे निर्बंध शिथिल के ले त्याचे तपशीलही दिले. उदाहरणार्थ मॉल आणि बाजार संकुले ठरावीक वेळेत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. तसेच सांघिक नसलेल्या गोल्फ, बॅडमिंटन, मल्लखांब, जिम्नॅस्टिक आदी

क्रीडा प्रकारांनाही सशर्त सूट दिली गेली. मात्र ही सूट ५ ऑगस्टपासून लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले. या आदेशात वाहतुकीबाबतचे निर्बंधही शिथिल करण्यात आले. दुचाकीवरून चालक आणि मागे बसणारा अशा दोन व्यक्ती प्रवास करू शकतात, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र ही सूट कधीपासून लागू असेल, हे मात्र या आदेशात नमूद नाही. त्यामुळे हे आदेश निघताच नागरिकांनी दुचाकीवरून डबल सीट प्रवास सुरू के ला.

सोमवारी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन असल्याने रस्त्यावर वाहनांची विशेषत: दुचाकींची संख्या जास्त होती. त्यातच पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी लावून दोन व्यक्ती प्रवास करणाऱ्या दुचाकी अडवल्या. काही ठिकाणी या मुद्दय़ावरून पोलीस आणि नागरिकांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या. परिणामी रक्षाबंधनासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना मनस्ताप सोसावा लागला.

पोलीस दलातच एकवाक्यता नाही

दंड करणाऱ्या पोलिसांना काही दुचाकीस्वारांनी नियम शिथिल झाल्याबद्दल विचारणा के ली तेव्हा संबंधित माहिती अद्याप आमच्यापर्यंत पोहोचली नाही, अशा प्रतिक्रि या पोलिसांनी दिल्या. पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा के ली असता त्यांच्यातही एकवाक्यता आढळली नाही. काहींनी आदेश जारी झाल्यावरच दुचाकींवर दोन व्यक्तींना प्रवासाची मुभा दिल्याचे सांगितले, तर काहींनी ही सूट ५ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट के ले.

दुचाकीवरून दोघांना प्रवासाची मुभा ५ ऑगस्टपासून अमलात येणार आहे. मात्र हेल्मेट, मुखपट्टी बंधनकारक असेल. हेल्मेट नसल्यास कारवाई होतेच, पण मास्क नसेल तरीही कारवाई होऊ शके ल.

– मधुकर पांडे, सहपोलीस आयुक्त (वाहतूक)