विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी
‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राच्या मालमत्तेच्या गैरवापरावरून भाजपने काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांवर आरोप केले असतानाच, ‘मुंबई तरुण भारत’ या वृत्तपत्राच्या मालकीवरून काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले आहे. भाजपशीसंबंधित वृत्तपत्र चालविणाऱ्या कंपनीचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे संचालक असून, आपल्याच कंपनीच्या व्यावसायिक भागीदाराची विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करताना आर्थिक हितसंबंध जपल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. बोगस पदवी, अग्निशमन उपकरणांची खरेदी आणि आता आर्थिक हितसंबंध यात तावडे गुंतलेले असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
‘नॅशनल हेराल्ड’ या वृत्तपत्राच्या मालमत्तेच्या वापरावरून झालेल्या खटल्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना न्यायालयाची पायरी चढायला लागली होती. काँग्रेसला हे फारच झोंबले होते. त्यातच मुंबईतील हेराल्डच्या मालमत्तेवरून राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने चौकशी सुरू केली होती. भाजपला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपशीसंबंधित ‘मुंबई तरुण भारत’ कंपनीचे प्रकरण लावून धरले आहे. भाजपला टक्कर देण्याकरिता पृथ्वीराजबाबांनी आता पुढाकार घेतला आहे.
तावडे यांच्या बोगस पदवीचे प्रकरण गाजले. त्याचा अजूनही तावडे योग्य खुलासा करू शकलेले नाहीत. अग्निशमन उपकरणांच्या खरेदीतही त्यांच्यावर आरोप झाले. भाजपकडून नैतिकतेच्या गप्पा मारल्या जातात. देवेंद्र फडणवीस विरोधात असताना आघाडीच्या कोणत्याही मंत्र्यावर आरोप झाल्यावर त्याच्या राजीनाम्याची मागणी करायचे. तावडे यांच्यावर लागोपाठ तीन गंभीर आरोप झाल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. काँग्रेस हे प्रकरण धसास लावणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

प्रकरण काय आहे?
‘मुंबई तरुण भारत’ हे वृत्तपत्र ‘श्री मल्टिमीडिया व्हिजन लिमिटेड’ कंपनीने चालविण्यास घेतले होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर हे संचालक होते. यापैकी गडकरी यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला असला तरी माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार तावडे अजूनही संचालक आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. एका कंपनीचे संचालक असताना २०१४ मध्ये विधान परिषदेच्या व नंतर सहाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेखही तावडे यांनी केलेला नाही. याशिवाय, महाराष्ट्र भाजपने २५ लाख रुपयांचे कर्ज दिलेल्या या कंपनीतील व्यावसायिक भागीदार दिलीप करंबेळकर यांची विभागाचा प्रस्ताव डालवून राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मराठी भाषा विभागाने प्रस्तावित केलेल्या २४ नावांमध्ये करंबेळकर यांच्या नावाचा उल्लेखही नव्हता. पण तावडे यांनी आपल्या व्यावसायिक भागीदाराची आपल्या खात्याअंतर्गत मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करून आर्थिक हितसंबंध जपल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. तावडे यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार करंबेळकर यांच्या नावाची शिफारस करण्यात येत असल्याचे पत्रच चव्हाण यांनी सादर केले. मंत्र्याचा विशेष कार्यकारी अधिकारी सरकारमध्ये निर्णय घेतो का, असा सवालही त्यांनी केला. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या विचारवंताने अध्यक्षपद भूषविलेल्या विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी करंबेळकर यांच्यासारख्या संघ स्वंयसेवकाची निवड करून तावडे यांनी या पदाची प्रतिष्ठा घालवल्याची टीका चव्हाण यांनी केली.

‘मुंबई तरुण भारत’ चा मी मानद संचालक असून त्यामध्ये माझी एका पैचीही आर्थिक गुंतवणूक नाही किंवा त्यांच्याकडून मानधनही मिळत नाही. त्यामुळे निवडणुकीसाठीच्या शपथपत्रात त्याबाबत उल्लेख केला नाही. पृथ्वीराज चव्हाण आणि मलिक यांचे आरोप अपुऱ्या माहितीवर आधारित आहेत. सरकारला नियुक्तीचे अधिकार आहेत आणि करंबेळकर हे त्या पदाला पात्र आहेत म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
– विनोद तावडे, सांस्कृतिक मंत्री