काँग्रेसचा रविवारी मोर्चा, राष्ट्रवादी विधेयक रोखणार
भाडेनियंत्रण कायद्यात बदल करून घरभाडय़ांमध्ये प्रचंड वाढ करण्याच्या भाजप सरकारच्या प्रस्तावाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. विधान परिषदेत हे विधेयक चर्चेला येईल तेव्हा ते रोखण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. या मुद्दय़ावर काँग्रेसने रविवारी मोर्चा आयोजित केला आहे.
गृहनिर्माण धोरणाला अद्याप मान्यता देण्यात आलेली नसली तरी पडद्याआडून या धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे. नव्या धोरणानुसार मुंबईकरांच्या घरभाडय़ात जवळपास ५०० टक्के वाढ होणार आहे. ही भाडेवाढ सर्वसामान्य मुंबईकरांवर अन्याय करणारी असल्याची टीका राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली. शिवसेनेने या धोरणाला विरोध केला असला तरी मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री या धोरणाला विरोध करीत नाहीत. शिवसेनेचे गृहनिर्माण राज्यमंत्र्यांची भूमिका दुटप्पी राहिली आहे. भाजपच्या मंगलप्रभात लोढा आणि राज पुरोहित या दोन आमदारांनी प्रस्तावित भाडेवाढीस विरोध केला असला तरी त्यामागे वेगळा उद्देश आहे. एखाद्या प्रश्नावर निर्णय घ्यायचा, त्यावर आोरड झाल्यावर सरकारकडून स्थगिती मिळवायची ही काही जणांना सवयच जडल्याची टीका अहिर यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांना उद्देशून केली. मोकळ्या जागांवरून भाजपने घूमजाव केल्याचा आरोपही अहिर यांनी केला.
घरमालकांच्या हितासाठीच घरभाडेवाढीचा प्रस्ताव भाजपने पुढे रेटल्याचा आरोपही मलिक यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाडेवाढीस विरोध केला जाणार असून त्यासाठी आंदोलन केले जाणार आहे. नवीन रचनेनुसार भाडे सामान्य नागरिकांना परवडणारे नाही. या नागरिकांना घराबाहेर काढून बिल्डरांचा फायदा करण्याचा मुख्यमंत्री फडणवीस आणि गृहनिर्माणमंत्र मेहता यांचा डाव असल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला. भाजपच्या या मालकधार्जिण्या धोरणास विधिमंडळात विरोध केला जाईल, असे अहिर यांनी जाहीर केले.
काँग्रेसचा ‘वर्षां’ बंगल्यावर मोर्चा
भाडेकरून जाचक ठरणाऱ्या भाडेवाढीस विरोध करण्याकरिता येत्या रविवारी ऑगस्ट क्रांती मैदान ते ‘वर्षां’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी जाहीर केले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाडेवाढीचा मुद्दा तापविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.