श्रीहरी अणे यांचा बोलविता धनी कोण, असा सवाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिफारशीवरून त्यांची नियुक्ती झाल्याने मुख्यमंत्र्यांनाही थोडे दमाने घ्यावे लागल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.

अणे यांच्या विधानाचे विधानसभेत संतप्त पडसाद उमटले. अणे यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. शिवसेनेचे प्रताप सरनाईक हे आक्रमक झाले होते. महाराष्ट्राचे तुकडे करण्यास निघालेल्या अणे यांना पदावरून दूर करावे व तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा इशारा दिला. अणे यांना तात्काळ पदावरून दूर करावे व तसा प्रस्ताव सभागृहात मंजूर करावा, असे मत गणपतराव देशमुख (शेकाप) यांनी मांडले.  घटनेच्या १६५व्या कलमानुसार सरकारला सल्ला देणे हे महाधिवक्त्याचे काम आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे. ते जर राज्याच्या विरोधात वैयक्तिक मते मांडत असल्यास चुकीचे असल्याकडे दिलीप वळसे-पाटील यांनी लक्ष वेधले.

अणे यांना त्वरित पदच्युत करा आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरा, अशी मागणी करीत विरोधकांनी सोमवारी विधान परिषदेचे कामकाज रोखले. अणोंच्या मतांशी सरकार सहमत नसून त्यांच्याबाबतची भूमिका मुख्यमंत्री उद्या सभागृहात मांडतील असे सभागृहनेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.